नवी दिल्ली : सगळ्या देशाचे लक्ष बंगाल व इतर विधानसभांच्या निवडणुकांकडे लागलेले असताना भाजपने दिल्लीत आम आदमी पक्षाला आणि विरोधकांनाही मोठा धक्का दिला. ‘आप’च्या राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात राज्यसभा खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्व फुटीर नेत्यांनी संध्याकाळी उशिरा भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली.
दरम्यान, आम आदमी पक्षाने यावर जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली असून ही पंजाबशी गद्दारी आहे असे त्याच्या नेत्यांनी म्हटले आहे. पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाचे मोठे बहुमत असल्याने त्याच्या बळावरच हे सर्वजण राज्यसभेत खासदार होऊ शकले होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना राघव चढ्ढा म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदारांपैकी दोन तृतीयांश खासदारांनी पक्ष सोडला असून ते एका गटाच्या स्वरूपात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इतर खासदारांमध्ये हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल आणि अशोक मित्तल यांचा समावेश आहे. यावेळी पत्रकार परिषदेला पाठक आणि मित्तल देखील उपस्थित होते.
राज्यसभेत आम आदमी पक्षाचे १० खासदार आहेत. त्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार आमच्या सोबत आहेत. त्यांनी आधीच स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आज सकाळी आम्ही स्वाक्षरी केलेली पत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे राज्यसभा सभापतींकडे सुपूर्द केली आहेत, असे चड्ढा यांनी जाहीर केले. "ज्या 'आप'ला मी माझ्या रक्ताने आणि घामाने सिंचले आणि ज्यासाठी मी माझ्या तारुण्याची १५ वर्षे दिली, तो पक्ष आता आपली तत्त्वे, मूल्ये आणि नैतिकतेपासून पूर्णपणे भरकटला आहे," असे चड्ढा म्हणाले.
राघव चड्ढा हे गेले काही दिवस पक्षापासून फटकून राहत असल्याने यांना राज्यसभेतील 'आप'च्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या मित्तल यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर चड्ढा यांनी जोरदार टीका केली. पक्ष आता देशासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे. "गेल्या काही वर्षांत मला प्रकर्षाने जाणवू लागले की मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे. आज मी 'आप'पासून दूर जाण्याचा आणि जनतेशी अधिक जवळीक साधून काम करण्याचा निर्णय जाहीर करत आहे," असे ते म्हणाले.
दुसरे राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले की, "अशी परिस्थिती निर्माण होईल असे मला कधीच वाटले नव्हते, पण ती आली आहे. गेली १० वर्षे मी या पक्षाशी जोडलेला होतो आणि आज मी आम आदमी पक्षापासून वेगळा होत आहे. तर, केजरीवाल यांच्या आशीर्वादाने आम आदमी पार्टीमध्ये वाढणारा भ्रष्टाचार, महिलांविरुद्ध छळ आणि हल्ल्याच्या घटना, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दिले जाणारे प्रोत्साहन आणि पंजाबची होत असलेली लूट व फसवणूक पाहून मी आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्वाती मालीवाल यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या ७ खासदारांना 'गद्दार' म्हटले असून, त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांशी विश्वासघात करणाऱ्या पक्षाशी हातमिळवणी केल्याचे म्हटले आहे.
२०२७ च्या निवडणुकांची तयारी
पंजाबमध्ये पुढील वर्षी म्हणजे २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका असून त्यांची तयारी भाजपने सुरू केल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आजच्या फुटीमुळे आपचे आता राज्यसभेत केवळ तीन खासदार राहिले असून भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. या फुटीमुळे पंजाबमध्ये आप आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याची चुणूक शुक्रवारी दिसली. या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. आप पूर्णपणे विखुरली असून ती आता ‘भ्रष्टाचाराचा अड्डा’ बनली असल्याचा हल्ला भाजपने चढवला. ज्या पक्षाने ‘वेगळा पक्ष’ असल्याचा दावा करत सुरुवात केली होती, तो आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटले आहे.
गद्दारी, विश्वासघात - ‘आप’ची प्रतिक्रिया
पंजाबच्या जीवावर निवडून आलेल्या या खासदारांनी पंजाबशी गद्दारी व विश्वासघात केला आहे, अशी टीका पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल व इतर नेत्यांनी केली आहे. खासदार संजय सिंह यांनी भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’ राबवल्याचा आणि पंजाबमधील भगवंतसिंग मान सरकारचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. १५ एप्रिल रोजी अंमलबजावणी संचालनालयाने फेमा चौकशीचा भाग म्हणून पंजाबमधील ‘आप’ खासदार अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यावसायिक संस्थांवर छापे टाकले होते. त्यामुळेच ही फूट घडून आली आहे असेही सिंह यांनी नमूद केले.