(Photo-X/@rajnathsingh)
राष्ट्रीय

एरो इंजिन पाच वर्षात विकसित करा‌वे; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे शास्त्रज्ञांना आवाहन

प्रगत देशांना एरो इंजिन विकसित करायला २५ ते ३० वर्षे लागतात. आपली २० वर्षे निघून गेली आहेत. आपल्या हातात केवळ ५ ते ७ वर्षे उरली आहेत. त्यामुळे पुढील पिढीच्या एरो इंजिन विकासाला गती देण्यात यावी, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शास्त्रज्ञांना केले.

Swapnil S

बंगळुरू: प्रगत देशांना एरो इंजिन विकसित करायला २५ ते ३० वर्षे लागतात. आपली २० वर्षे निघून गेली आहेत. आपल्या हातात केवळ ५ ते ७ वर्षे उरली आहेत. त्यामुळे पुढील पिढीच्या एरो इंजिन विकासाला गती देण्यात यावी, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शास्त्रज्ञांना केले.

डीआरडीओ अंतर्गत गॅस टर्बाईन रिसर्च इस्टाब्लिशमेंट (जीटीआरई) येथे भेट देऊन स्वदेशी लष्करी गॅस टर्बाइन इंजिन विकासाशी संबंधित सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती पाहिली. येणाऱ्या काळातील प्रकल्प, भारतीय उद्योग, शैक्षणिक संस्था व संशोधन संस्थांशी संवाद, तसेच संरक्षण दलांना दिला जाणारा पाठिंबा याबाबत त्यांना माहिती देण्यात आली.

सिंह यांनी स्वदेशी इंजिन्स व त्यांचे भाग यांचे प्रदर्शन पाहिले आणि ‘कावेरी इंजिन’ च्या पूर्ण आफ्टरबर्नर इंजिन चाचणीचे साक्षीदार झाले. डीआरडीओमधील शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या झपाट्याने बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीत एरो इंजिन तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता साध्य करण्याचे अत्यंत महत्त्व अधोरेखित केले. भारतात एरो इंजिन विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरवठा साखळ्या तुटत आहेत आणि नवे परिसंस्थात्मक ढाचे उभे राहत आहेत. ज्यांच्याकडे स्वदेशी, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे ती राष्ट्रे सुरक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण राहतील,” असे ते म्हणाले. या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रातील जीटीआरईच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांनी देशव्यापी भक्कम परिसंस्था उभारून पुढील पिढीच्या इंजिनांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

सहाव्या पिढीच्या प्रगत तंत्रज्ञानावरील संशोधन ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि नव्या साहित्याचा वापर वाढत आहे. एरो इंजिन विकास हा उष्मागतिकी, साहित्य विज्ञान, द्रवयांत्रिकी आणि प्रगत यांत्रिक अभियांत्रिकी यांचा समन्वय असलेला ‘अत्यंत गुंतागुंतीचा प्रयत्न’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी पद्धतींवर अधिक लक्ष केंद्रित करून भारतीय दलांना जागतिक दर्जाची प्रणाली व उपकरणे देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एरो इंजिन विकासासाठी ब्रिटनसोबतच्या संयुक्त अभ्यासाबद्दल त्यांनी जीटीआरईचे कौतुक केले आणि राष्ट्रीय एरो इंजिन मिशनअंतर्गत फ्रान्ससोबतही प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले.

सहाव्या पिढीच्या तंत्रज्ञानावर काम करणे गरजेचे

आपण वेगाने प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या रचना व विकासाकडे जात आहोत. एरो इंजिन क्षेत्रात कौशल्य मिळवण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले आहेत. आता ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे,” असे मंत्री म्हणाले. भारत फक्त पाचव्या पिढीच्या इंजिनांपुरता मर्यादित राहू शकत नाही; सहाव्या पिढीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा विकास शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

विवाहापूर्वी कुणावरही विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा लग्नपूर्व शारीरिक संबंधांबाबत सावधगिरीचा सल्ला

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार

मुंबईत आजपासून क्लायमेट वीक! अंतराळवीर राकेश शर्मा, शुभांशू शुक्ला एकाच मंचावर; सचिन तेंडुलकरसह क्लिंटन, गेट्स यांची उपस्थिती

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

फ्रान्स अध्यक्षांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ होणार; दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबईत आज मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय बैठक