भाषेच्या अडचणीचा गैरफायदा घेत टॅक्सीचालकाने दोन फ्रेंच महिला पर्यटकांकडून ५०० रुपयांऐवजी ५० युरो (सुमारे ५ हजार रुपये) घेतल्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आग्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित टॅक्सीचालकाचा शोध घेत पैसे परत मिळवून दिले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाषेच्या गैरसमजातून घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन फ्रेंच महिला पर्यटक दिल्लीहून टॅक्सीने आग्राला आल्या होत्या. त्यांचे आंतरराष्ट्रीय विमान उशिरा पोहोचल्याने टॅक्सीचालकाला विमानतळावर अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागली होती. त्यासाठी त्याच्याकडे ५०० रुपयांची अधिकृत पावतीही होती.
आग्रात पोहोचल्यानंतर चालकाने पर्यटकांकडे अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी केली. मात्र भाषेची अडचण असल्याने महिलांना रकमेचा गैरसमज झाला आणि त्यांनी ५०० रुपयांऐवजी थेट ५० युरो चालकाच्या हाती दिले. चालकानेही ती रक्कम स्वीकारून तेथून निघून गेला.
मार्गदर्शकामुळे प्रकार उघड
काही वेळाने एका स्थानिक पर्यटन मार्गदर्शकाने महिलांना त्यांनी जास्त पैसे दिल्याचे सांगितले. त्यानंतर धक्का बसलेल्या पर्यटकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. ताज सुरक्षा पोलीस आणि पर्यटन पोलीस ठाण्याच्या पथकाने त्वरित कारवाई करत संबंधित टॅक्सीचालकाचा शोध सुरू केला.
पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले
पोलिसांनी अल्पावधीतच चालकाला शोधून काढले. त्याच्याकडून ५० युरो परत घेऊन ते महिला पर्यटकांना सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी टॅक्सीचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ताजमहाल न पाहताच दिल्लीला परतल्या
या संपूर्ण प्रकारामुळे महिला पर्यटकांचा वेळ वाया गेला. पोलिसांनी त्यांना ताजमहाल पाहण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दिल्लीहून पुढील विमान पकडायचे असल्याने त्यांनी आग्रातून दुसरी टॅक्सी करून थेट दिल्लीकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला.
आग्रा पोलिसांचे मानले आभार
घटनेनंतर दोन्ही फ्रेंच पर्यटकांनी एक व्हिडीओ शेअर करत आग्रा पोलिसांचे आभार मानले. पैसे तातडीने परत मिळवून दिल्याबद्दल आणि त्वरीत कारवाई केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.