राष्ट्रीय

देशात ‘आयाराम-गयाराम’ला जोर! हरयाणातील भाजप खासदार काँग्रेसमध्ये, तर राजस्थानमधील काँग्रेसचे दोन माजी मंत्री भाजपमध्ये

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्तारूढ भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू असताना हरयाणातील हिसारमधील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम ठोकून रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Swapnil S

चंदिगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्तारूढ भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू असताना हरयाणातील हिसारमधील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम ठोकून रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजकीय कारणास्तव आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले. ब्रिजेंद्र सिंह यांना हिसारमधून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येणार आहे.

'एक्स' या समाजमध्यामावर आपला राजीनामा जाहीर करून ब्रिजेंद्र सिंह यांनी तडक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे निवासस्थान गाठले आणि तेथेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजय माकन, मुकुल वासनिक, दीपक बाबरिया हे काँग्रेसचे नेते हजर होते.

राजकीय कारणास्तव भाजपला रामराम

राजकीय कारणास्तव आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, हिसारमधून आपल्याला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, असे ब्रिजेंद्रसिंग यांनी म्हटले आहे. ‘जेजेपी’ पक्षाशी आघाडी कायम ठेवल्यास आपण पक्षाला रामराम करू, असा इशारा ब्रिजेंद्रसिंग यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यातच दिला होता.

दुसरीकडे राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र यादव आणि लालचंद कटारिया यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार रिचपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा आणि खिलाडी बैरवा, माजी अपक्ष आमदार आलोक बेनीवाल, काँग्रेस सेवादलाचे माजी राज्य प्रमुख सुरेश चौधरी, रामपाल शर्मा आणि रिजू झुनझुनवाला यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी येथील मुख्यालयात पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. शेतकरी, गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या व्यथांची भाजपला चांगलीच जाणीव असल्याने आपण पक्षात प्रवेश केल्याचे कटारिया म्हणाले.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

ठाणे मेट्रो-४च्या चाचणीला प्रारंभ

मतदार केंद्रांवर एजंट नियुक्त करा; निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना पत्र

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर