चंडीगढ : रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने काढलेली रॅली आणि मॉक पार्लमेंटवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “१ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीमध्ये हजारो शीख नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच दिवसाची निवड करून काँग्रेसने दिल्लीत राजकीय सभा आयोजित केली. हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या वेदनांचा विचार न करता सभा घेणे म्हणजे शीख समुदायाच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीका शहा यांनी केली.
पंजाब आणि देशातील नागरिक १९८४ मधील त्या भीषण घटनेला कधीही विसरू शकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंदीगडमधील सेक्टर १७ येथील तिरंगा पार्कमध्ये पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात शहा म्हणाले की, “पंजाबमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करायचे आहे. ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत पंजाब आणि संपूर्ण देशाला अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प आहे. १९८४ च्या दंगलींच्या स्मृती ताज्या असताना राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये महारॅली आयोजित करून शीख समुदायाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोहब्बत की दुकानमधून केवळ द्वेषच बाहेर पडतो. आजच्या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काँग्रेसला परदेशातून आदेश मिळाल्याचा आरोपही शाह यांनी केला.”
अराजकतेचा कट :नड्डा
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी रामलीला मैदानावरील रॅलीला ‘राजकीय नाटक’ संबोधत ती देशात अराजकता पसरवण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोप केला. “भारत हा ‘बनाना रिपब्लिक’ नाही, जिथे वाटेल तेव्हा जाळपोळ आणि दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात. रामलीला मैदानावर आज जे काही घडत आहे, तो लोकशाहीचा सन्मान नसून अराजकता निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे.