शहा - राहुल यांच्यात खडाजंगी; SIR, मतचोरी, निवडणूक आयोगावरून लोकसभेत गदारोळ 
राष्ट्रीय

शहा - राहुल यांच्यात खडाजंगी; SIR, मतचोरी, निवडणूक आयोगावरून लोकसभेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणा प्रक्रियेवर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी व अमित शहा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे लोकसभेतील वातावरण तापले.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणा प्रक्रियेवर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी व अमित शहा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे लोकसभेतील वातावरण तापले.

‘भाजपचे लोक चर्चेपासून पळत नाहीत. विरोधक ‘एसआयआर’वर खोटे पसरवत आहेत. देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे शहा यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले.

विरोधकांनी या विषयावर चर्चा करत असताना निवडणूक आयोगाची कार्यशैली आणि विशेष सखोल फेरतपासणीवर (एसआयआर) प्रामुख्याने चर्चा केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, आम्ही विरोधकांना म्हणालो होतो की, याची चर्चा आपण दोन अधिवेशन झाल्यानंतर करू. पण विरोधक यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे आम्ही याच अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार झालो.

ते पुढे म्हणाले, “विशेष सखोल फेरतपासणीवर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार नव्हतो. कारण एसआयआरची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. तो त्यांचा कार्यक्रम आहे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे सरकारसाठी काम करत नाहीत.

ज्या लोकांचे मतदार यादीत दोन वेळा नाव आले आहे, त्यावरही अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, दोन वेळा मतदार यादीत नाव येणे, हा तांत्रिक घोळ आहे. त्याबद्दल त्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही. २०१० साली बदललेल्या नियमामुळे हा तांत्रिक घोळ झाला असून अनेक मोठ्या नेत्यांची नावेही दोन ठिकाणी नोंदवली गेली आहेत.

आम्ही चर्चेसाठी घाबरत नाही!

आम्ही चर्चेसाठी तयार नाही, असे चित्र विरोधकांनी उभे केले. पण मी इथे ठामपणे सांगतो की, संसदेचे सभागृह हे अशाच चर्चांसाठी आहे आणि आम्ही भाजप-एनडीएवाले कधीही चर्चेला घाबरत नाही. संसदेच्या कायद्याप्रमाणे आम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, अशा शब्दात शहा यांनी विरोधकांना ठणकावले.

नेहरूंना फक्त दोन मते मिळाली होती

स्वातंत्र्यानंतर तीन वेळा ‘व्होट चोरी’ झाली. सर्वात आधी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान निवडायचा होता. त्यासाठी मतदान कोण करणार होते? तर त्यावेळी काँग्रेसचे जितके प्रांताध्यक्ष होते, त्यांच्या मतानंतर पंतप्रधान ठरणार होता. त्यावेळी २८ मते सरदार पटेल यांना मिळाली, तर फक्त दोन मते जवाहरलाल नेहरूंना मिळाली. तरीही पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनले, असे अमित शहा म्हणाले.

इंदिरा गांधींनी अनैतिक पद्धतीने निवडणूक जिंकली

अमित शहा यांनी पुढे इंदिरा गांधींच्या निवडणुकीचा किस्सा सांगत दुसरी ‘व्होट चोरी’ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “इंदिरा गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक जिंकली. विरोधी उमेदवार राजनारायण हे अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी निवडणुकीला आव्हान दिले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल देताना निवडणुकीत अनियमितता झाल्याचे मान्य केले. हीदेखील एक मोठी व्होट चोरी होती.”

सोनिया गांधींच्या काळात तिसरी ‘व्होट चोरी’

सोनिया गांधी यांच्या काळात तिसरी व्होट चोरी झाल्याचे शहा म्हणाले. योग्यता नसतानाही मतदार झाल्याचा प्रकार त्यांच्या काळात झाला. सोनिया गांधी या देशाच्या नागरिक होण्यापूर्वी मतदार बनल्या होत्या, याबद्दलचा वाद दिल्ली न्यायालयात पोहोचला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नमूद केले.

राहुल गांधींचे आव्हान

अमित शहा हे राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युतर देत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, माझ्या भाषणानंतर सरकार घाबरले आहे. त्यांनी माझ्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन दाखवावी. यामुळे शहा चांगलेच संतापले. माझ्या भाषणात काय असले पाहिजे, हे मीच ठरविणार. त्याबद्दल मला कुणी सूचना देऊ नये, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींना ठणकावले. यामुळे काही काळ या दोन नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?