नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील व स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान कमी लेखण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. तसेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासही जाणूनबुजून विलंब करण्यात आला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
राष्ट्रीय एकात्मता दिवस व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये 'एकता दौड'चे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, काँग्रेसने सरदार पटेलांवर अन्याय केला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांचा भव्य पुतळा उभारून त्यांचा सन्मान केला. पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या द्रष्टेपणामुळेच देशातील ५५० हून अधिक संस्थाने भारतात विलीन झाली. त्यामुळे देश एकसंघ राहिला. सरदार पटेल यांच्या प्रयत्नांमुळेच लक्षद्वीप, जुनागढ़, हैदराबाद हे भारतात विलीन झाले.
पटेलांना ४१ वर्षांनंतर 'भारतरत्न' पुरस्कार
सरदार पटेल यांच्या निधनानंतर ४१ वर्षानंतर १९९१ मध्ये त्यांना 'भारतरत्न' देऊन गौरवण्यात आले. काँग्रेसने त्यांना 'भारतरत्न' देण्यास विलंब लावला, असा आरोप शहा यांनी केला.
शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांसमोर २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प ठेवला आहे. 'रन फॉर युनिटी' चे आयोजन नेहमी ३१ ऑक्टोबरला केले जाते. यंदा दिवाळी असल्याने दोन दिवस आधी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरम्यान, 'धनत्रयोदशी' च्या मुहूर्तावर ही दौड आयोजित करण्यात आली. मोदी सरकार दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करते.