काँग्रेसने कलम १४-१५ चे उल्लंघन करून ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ आणण्यासाठी काम केले. त्यामुळे देशात तुष्टीकरण पाहायला मिळत आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला. आता देशातील प्रत्येक राज्यात हाच कायदा लागू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्यसभेतील चर्चेच्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, मुस्लिम धर्मासाठी स्वतंत्र कायदा आणण्याची भाषा काँग्रेसचे लोक करतात. मला काँग्रेसला विचारायचे आहे की, धर्मनिरपेक्ष राष्ट्रात सर्व धर्मांसाठी कायदा असावा की नाही? हे काँग्रेसवाले ५० टक्क्यांहून जास्त आरक्षण देण्याची भाषा करतात. देशातील दोन राज्यांमध्ये तर त्यांनी घटनाबाह्य पद्धतीने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. तरीही काँग्रेसची सत्ता असताना राज्यात धर्माच्या आधारे आरक्षण दिले जात होते, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत भाजपचा एकही सदस्य आहे, तोपर्यंत आम्ही धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही, हे घटनाविरोधी आहे, असा घणाघात त्यांनी केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मंडल आयोगाच्या विरोधात सर्वात प्रदीर्घ भाषण केले होते. राजीव गांधींचे भाषण लोकसभेच्या रेकॉर्डवरही आहे. तुम्ही भाषण वाचू शकता. मोदी सरकारने ओबीसी आयोगाला मान्यता देऊन मागासवर्गीयांचा आदर केला. काँग्रेस पक्ष आरक्षणविरोधी आहे. त्याचे म्हणणे आणि करणे यात फरक आहे. काकासाहेब आयोगाचा अहवाल कुठे आहे, कोणी सांगू शकेल का? या आयोगाचा अहवाल स्वीकारला असता तर १९८० मध्ये मंडल आयोगाच्या अहवालाची गरजच पडली नसती, असे ते म्हणाले.
माणसाची आर्थिक स्थिती ही त्याच्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीवर अवलंबून असते. ७५ वर्षं गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेसने देशातील लोकांना गरीब ठेवले. मोदी सरकारने कोट्यवधी गरीब महिलांना उज्ज्वला कनेक्शन देऊन गॅस सिलिंडर दिले, कोट्यवधी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आणि आयुष्मान योजनेत लोकांना मोफत उपचार मिळाले, असे त्यांनी सांगितले.
शहा म्हणाले, “संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेली चर्चा देशातील तरुणांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यामुळे देशातील जनतेला, कोणत्या पक्षाने संविधानाचा सन्मान केला आणि कुणी नाही, हे समजून घ्यायलाही मदत होईल. मी सरदार पटेलांचे आभार मानतो, कारण त्यांच्या संघर्षामुळेच आज आपला देश जगात भक्कमपणे उभा आहे.
जनतेने हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला
गेल्या ७५ वर्षांत अनेक देशांमध्ये लोकशाही यशस्वी ठरू शकली नाही. मात्र आपली लोकशाही खोलवर रुजलेली आहे. आपण रक्ताचा एक थेंबही न सांडता अनेक बदल केले आहेत. या देशातील लोकांनी अनेक हुकूमशहांचा अहंकार लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमाने मोडीत काढला आहे, असे शहा म्हणाले.
जे लोक म्हणत होते की, आपण आर्थिकदृष्ट्या बलशाली होऊ शकणार नाही, त्यांनाही आपल्या जनतेने आणि आपल्या राज्यघटनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील ५ व्या क्रमांकाची बनली आहे. भारतावर अनेक वर्षं राज्य करणारा ब्रिटनही अर्थव्यवस्थेबाबतीत आज आपल्यापेक्षा बराच मागे पडला आहे, असे शहा यांनी सांगितले.