मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. मदर डेअरीने आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे अमूल ब्रॅण्डचे संचलन करणाऱ्या गुजरात को-ऑप मिल्क मार्केटिंग फेडरेशननेही ताज्या पाऊच दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. मदर डेअरीने आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे अमूल ब्रॅण्डचे संचलन करणाऱ्या गुजरात को-ऑप मिल्क मार्केटिंग फेडरेशननेही ताज्या पाऊच दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ त्वरित म्हणजे गुरुवारपासून लागू होणार आहे. दूध खरेदीसाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या वाढीव किमती आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मदर डेअरीने यापूर्वी १४ मे २०२६ रोजी दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. कंपनीने पॅकबंद तसेच खुल्या दुधाच्या विविध प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या नव्या किमती टोन्ड दूध (बल्क व्हेंडेड) ५८ रुपयांवरून ६० रुपये प्रतिलिटर, फुल क्रीम दूध ७२ रुपयांवरून ७६ रुपये प्रतिलिटर, टोन्ड दूध (पॅकबंद) ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलिटर, डबल टोन्ड दूध ५४ रुपयांवरून ५६ रुपये प्रतिलिटर, गायीचे दूध ६२ रुपयांवरून ६५ रुपये प्रतिलिटर असे करण्यात आले आहेत. अमूलच्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३ टक्के फॅट असलेल्या 'अमूल ताझा' दुधाचा दर प्रतिलिटर २ रुपयांनी (३.३ टक्के) वाढला आहे, तर ६ टक्के फॅट असलेल्या 'अमूल गोल्ड' दुधाचा दर प्रतिलिटर ४ रुपयांनी (५.५ टक्के) वाढला आहे. यापूर्वी मे महिन्यात दुधाचे दर वाढवण्यात आले होते.

सर्वसामान्यांना फटका

दुधाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे दैनंदिन वापरातील महत्त्वाचे घटक असल्याने या दरवाढीचा परिणाम इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवरही होऊ शकतो. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अन्नधान्य व खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ७.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ५.९७ टक्के होता. कांदा आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे किरकोळ महागाईतही वाढ नोंदवण्यात आली आहे.

दूध खरेदी महागली

दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याचे दर वाढल्याने कंपनीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. हा वाढीव खर्च अंशतः ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय मदर डेअरीने घेतला आहे. कंपनी आपल्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ७५ ते ८० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देते. मदर डेअरीची दिल्ली-एनसीआरमध्ये दररोज सुमारे ३५ लाख लिटर दुधाची विक्री होते. तर देशभरातील दैनंदिन विक्री ५० लाख लिटरपेक्षा अधिक आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

सायबर चोरांचा उच्छाद! राज्यात दररोज ८.७२ कोटींचा गंडा; आठ महिन्यांत २,११९ कोटींची फसवणूक

अमेरिकेची कोंडी की चीनची बाजी?

आजचे राशिभविष्य, १२ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नेहमीच्या भाजीला द्या ब्रेक! जेवणाची लज्जत वाढवेल पालक-बटाट्याची चमचमीत भाजी; नोट करा रेसिपी