पाटणा : बिहारच्या राजकारणात सत्तांतराचे नाट्य झाल्यानंतर, जनता दल युनायटेड पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. रविवारी नितीश यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच आरजेडीचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीनप्रकरणी लालू यादव यांना सोमवारी ईडी कार्यालयासमोर हजर करण्यात आले. लालूप्रसाद यादव यांची नऊ तास चाैकशी करण्यात आली. यावरून त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी समाजमाध्यमाच्या आधारे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या वडिलांना काही बरे-वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सीबीआय, ईडी आणि त्यांचे मालक यांच्यावर असेल, असा इशाराच रोहिणी यांनी नाव न घेता भाजपसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिला आहे. रोहिणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज जर वडिलांना काही झाले तर त्याला सीबीआय, ईडी आणि त्यांचे मालक जबाबदार असतील. बिहार सरकारमधून लालूंची आरजेडी रातोरात बाहेर फेकली गेली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार लालू यादव यांना ईडीसमोर हजर केले जात आहे. यावरून लालूंची लेक चांगलीच संतापली असल्याचे दिसून येत आहे.