लखनऊ : गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला जावा आणि गायीची खरेदी-विक्री किंवा मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असावी अशी मागणी जमीयत उलेमा-ए-हिंद (अरशद मदनी गट) चे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी केली असून अनेक मुस्लिम संघटनांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
असा निर्णय झाला तर गायीच्या मुद्द्यावर होणारे राजकारण थांबेल आणि गोहत्येच्या संशयावरून होणारे मॉब लिंचिंग किंवा जमावाकडून होणारी हत्या आणि इतर अत्याचार थांबण्यास मदत होईल, अशी आशा या संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
मौलाना मदनी यांनी २०१४ च्या सर्वधर्मपरिषदेत पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतर केंद्रात व अनेक राज्यांमध्ये भाजप सरकारे असूनही ती पूर्ण होऊ शकलेली नाही. अलिकडे त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला.
ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी मौलाना मदनी यांच्या मागणीचे पूर्ण समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, विविध मुस्लिम संघटनांमध्ये या विषयावर सहमती घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. लवकरच दिल्लीत प्रमुख मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली जाईल, जिथे मागण्यांचे एक संयुक्त निवेदन तयार करून ते पंतप्रधानांसह देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे सादर केले जाईल.
ऑल इंडिया कुरेशी जमात या मांस व्यवसायाशी संबंधित या प्रमुख संघटनेनेही या मागणीचे समर्थन केले आहे. आपल्या संघटनेने अनेक वर्षांपासून ही मागणी लावून धरली असून गरज पडल्यास आपण पंतप्रधानांची भेट घेऊ, असे तिचे अध्यक्ष सिराज कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे.
ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सरचिटणीस मौलाना यासूब अब्बास यांनी म्हटले आहे की, ही मागणी रास्त आहे, परंतु सरकारने त्याकडे प्रामाणिकपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या राज्यांत गाईचे मांस खाण्यावर निर्बंध नाहीत आणि ज्या राज्यांत गाईच्या नावाने जीव घेतले जातात, अशी विसंगती नसावी.
इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कौसर हयात खान: त्यांनी या मागणीचे तांत्रिकदृष्ट्या समर्थन केले आहे. त्यांनी टीका केली की, गोवा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत, जिथे भाजपची सत्ता आहे, तिथे गाईचे मांस खाण्यावर निर्बंध नाहीत, तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या मुद्द्याचे राजकारण केले जाते.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी आमच्या हिंदू बांधवांच्या गाईबद्दल धार्मिक भावना आहेत; म्हणून त्यांच्या भावनांचा आदर करून गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे," असे नमूद केले. संपूर्ण देशात गाईच्या कत्तलीबाबत एकसमान कायदा असावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ईदच्या पार्श्वभूमीवर...
येत्या बुधवारी २७ मे रोज बकरीद असून त्या पार्श्वभूमीवर गोहत्येचा प्रश्न काही राज्यांमध्ये भाजपकडून उपस्थित करणे सुरु झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये गोहत्येला प्रतिबंध करण्याचा आदेश नवीन भाजप सरकारने काढला असून त्याला स्थगिती देण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. महाराष्ट्रात गोहत्या किंवा गोमांसाची विक्री करणाऱ्याला मोक्का लावला जाईल असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या निमित्ताने काही भागात तणाव निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम संघटनांनीच पुढे येऊन ही मागणी लावून धरण्याला महत्व प्राप्त झाले आहे.