नवी दिल्ली : अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तथापि, या काळात त्याला अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. सध्या त्याच्यावर जोधपूरच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
अंतरिम जामीन देत असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवता येऊ शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर रोजी आसाराम बापूला १८ दिवसांचा पॅरोल दिला होता. त्यानंतर १ जानेवारी रोजी जोधपूर कारागृहात परतल्यानंतर आता पुन्हा एकदा अंतरिम जामीन देण्यात आला आहे. गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसारामला बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.