राष्ट्रीय

आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा; द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी रामपूर कोर्टाचा निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे

वृत्तसंस्था

समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार आणि माजी मंत्री आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. रामपूर न्यायालयाने त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अशा स्थितीत आता आझम खान यांच्या आमदारकीवर संकट आले आहे. आझम खान हे सध्या रामपूर विधानसभेचे आमदार आहेत.

आझम खान यांच्यावर गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे. मिलक पोलीस ठाणे परिसरात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीसाठी आझम खान हे न्यायालयात हजर झाले नाहीत, त्यामुळे या प्रकरणी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आझम खान अनेक प्रकरणांमध्ये २७ महिने तुरुंगात होते, त्यांना २० मे २०२२ रोजी जामीन मिळाला आहे.

२०१९ मध्ये मिलक ठाण्यातील व्हिडिओ मॉनिटरिंग टीमचे प्रभारी अनिल कुमार चौहान यांनी द्वेषपूर्ण भाषण (हेट स्पीच) प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता दोषी ठरल्यानंतर आझम खान यांचे विधानसभेचे सदस्यत्वदेखील रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. द्वेषपूर्ण भाषणाच्या बाबतीत, १५३-ए कलमामध्ये जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा झाली तर त्यांची आमदारकीही जाईल. आझम खान हे रामपूरमधून १० वेळा आमदार राहिले आहेत आणि सपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांची आमदारकी रद्द झाल्यास समाजवादी पक्षासाठी हा फार मोठा धक्का असेल.

आझम खान यांच्यावर ८० गुन्हे

भाजप सरकारच्या मागील कार्यकाळात आझम खान यांच्यावर जवळपास ८० गुन्हे दाखल करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने बळकावण्यापासून ते पुस्तके चोरणे, मारहाण करणे, शेळ्या-म्हशी चोरणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे.

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अतिक्रमण : मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णायक पाऊल; पुनर्वसनासाठी विशेष समिती स्थापन करणार

मिठी नदी घोटाळा : सीईओ केतन कदमला न्यायालयाचा दणका; दुसऱ्यांदा फेटाळला जामीन

Bihar Assembly Elections 2025 : प्रशांत किशोर यांची माघार