PTI
राष्ट्रीय

पुनिया, विनेश फोगट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हरयाणा विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Swapnil S

नवी दिल्ली: हरयाणा विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या दोन्ही कुस्तीपटूंना पक्षाची उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय काँग्रेसची मध्यवर्ती निवडणूक समिती घेईल, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ, प्रवक्ते पवन खेरा आणि हरयाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांच्या उपस्थितीत पुनिया आणि फोगट यांनी पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी या दोघांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

संकटकाळात काँग्रेस पाठीशी

आपण ज्या यातना भोगल्या तशा यातना अन्य क्रीडापटूंना भोगाव्या लागू नयेत, अशी आपली इच्छा असल्याचे फोगट यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर सांगितले. कठीण प्रसंगात आपल्यासमवेत कोण आहे हे काँग्रेसने दर्शवून दिले त्याबद्दल फोगट यांनी पक्षाचे आभारही मानले. आम्हाला रस्त्यावर फरफटण्यात आले, तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्या पाठीशी उभे राहिले, असेही फोगट यांनी सांगितले.

आम्ही त्यांच्या पाठीशी

ज्या यातना आम्ही भोगल्या तशा यातना भोगणाऱ्या सर्व महिलांच्या पाठीशी आम्ही आहोत, अशी ग्वाही फोगट यांनी दिली. भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण सरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या निदर्शनात पुनिया आणि फोगट सहभागी झाले होते.

कारणे दाखवा नोटीस

पक्षप्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वेणुगोपाळ म्हणाले की, फोगट यांनी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने फोगट यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली. राजकीय नेत्यांची भेट घेऊन सेवा-शर्तीचा भंग केल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे. विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणे हा गुन्हा आहे का, असा सवाल वेणुगोपाळ यांनी केला आणि फोगट यांना लवकर सेवामुक्त करावे, त्यामध्ये राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी