ढाका : बांगलादेश हवाई दलाचे एक प्रक्षिक्षणासाठी वापरले जाणारे विमान सोमवारी ढाका येथील शाळेवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चिनी बनावटीचे ‘एफ-७’ हे विमान ढाकाच्या उत्तर भागातील ‘माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज’ इमारतीवर कोसळले.
या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून दाखवण्यात येत असलेल्या फुटेजनुसार, अपघातस्थळी आगीचे लोट आणि काळा धूर दिसत आहे. दरम्यान, बचाव पथकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या बचावासाठी लष्कराचे पथक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक माध्यमांना प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान ‘माइलस्टोन कॉलेज’च्या कॅन्टीनवर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळले.