नवी दिल्ली : ऑनलाइन बेटिंग ॲप ‘१एक्स बेट’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह अभिनेता सोनू सूद यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. या कारवाईमुळे क्रीडा आणि मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीने शुक्रवारी केलेल्या कारवाईत एकूण ७.९३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा या क्रिकेटपटूंसोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह उर्वशी रौतेला, सोनू सूद, मिमी चक्रवर्ती, अंकुश हजारा आणि नेहा शर्मा यांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
‘१एक्स बेट’ या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडीकडून सुरू आहे. याआधी ईडीने शिखर धवन आणि सुरेश रैना यांचीही मालमत्ता जप्त केली. या संपूर्ण प्रकरणात ईडीने आतापर्यंत एकूण १९.०७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
प्रकरण काय?
‘१एक्स बेट’ हे एक विदेशी ऑनलाइन सट्टेबाजीचे अॅप आहे, ज्याला भारतात अधिकृत परवानगी नाही. मात्र, अनेक सेलिब्रिटींनी या अॅपच्या जाहिराती आणि प्रमोशनमध्ये सहभाग घेतला. या प्रमोशनच्या बदल्यात मिळालेले मानधन आणि त्यातून झालेली आर्थिक उलाढाल ही मनी लॉन्ड्रिंगच्या कक्षेत येत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या सेलिब्रिटींनी बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंगला प्रोत्साहन दिल्याचा आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवल्याचा ठपका ठेवत ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.