लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला असून बिहारच्या राजकारणात वेगवान घडामोडी आणि नवी समीकरणं पाहायला मिळत आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली असून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी सकाळी त्यांनी राजभवन येथे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला. राजभवानातून बाहेर पडल्यावर, "आप सब लोगों को हम बता देते है, की आज हमने इस्तीफा दे दिया है, समज गए ना..." असे म्हणत नितीश यांनी प्रसारमाध्यमांसमोर राजीनामा दिल्याची आणि राज्यातील विद्यमान सरकार विसर्जित केल्याची घोषणा केली.
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, ही वेळ का आली? असा प्रश्न नितीश यांना पत्रकारांनी विचारले असता, "इस्तीफा देने की नौबत इसलिए आई क्योंकि ठीक नहीं चल रहा था", असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडल्याचे सांगितले. महाआघाडी तोडण्याचा निर्णय का घेतला असे विचारले असता, 'दीड वर्षापूर्वी महाआघाडीत आलो. पण येथेही परिस्थिती चांगली दिसत नव्हती', असे ते म्हणाले. "सबकी राय आ रही थी, पार्टी की राय थी चारों तरफ से कहा जा रहा था जिसके बाद हमने ये फैसला लिया", असे नितीश यांनी सांगितले.
राज्यपालांनी नितीश यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्यास सांगितले आहे. आज संध्याकाळी नितीश पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपच्या पाठिंब्यानं ते सरकार स्थापन करणार आहेत.
चार वर्षांत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर ते आता एनडीएच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन राजभवनात जाऊ शकतात जिथे ते आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना सुपूर्द करतील. नितीश कुमार यांचा राजीनामा 'इंडिया' आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार चार वर्षांत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदारांची बैठक झाली, ज्यामध्ये बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी आणि विरोधी पक्षनेते विजय सिन्हा हे दोघेही नव्या सरकारमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री असतील. बिहारच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपकडे विधानसभेच्या 78 जागा आहेत, तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत. तर एनडीएचा मित्रपक्ष एचएएमचे 4 आमदार आहेत. हा एकूण आकडा 127 होतो जो बहुमतापेक्षा 5 ने अधिक आहे.