राष्ट्रीय

Flipkart मध्ये 'बन्सल युग' संपले! बिन्नी बन्सल यांचा राजीनामा; 'हे' आहे कारण

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच फ्लिपकार्टवर 16 वर्षांपासून सुरू असलेले बन्सल युग संपले

Swapnil S

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच फ्लिपकार्टवर 16 वर्षांपासून सुरू असलेले बन्सल युग संपले आहे. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी 2007 मध्ये हे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म सुरू केले. सचिन बन्सल यांनी आधीच आपले संपूर्ण स्टेक वॉलमार्टला विकले होते.

कारण काय?

ईकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, बिन्नी बन्सल सध्या सिंगापूरमध्ये आहेत. त्यांनी ई कॉमर्स क्षेत्रातील आपल्या नवीन उपक्रमाशी संघर्ष होत असल्याचा हवाला देत या आठवड्याच्या सुरुवातीलाच राजीनाम्याबद्दल बोर्डाला सांगितले. बिन्नी बन्सल यांनी OppDoor नावाच्या एका नवीन ईकॉमर्स स्टार्टअपची सुरूवात केली आहे.

"फ्लिपकार्ट मजबूत स्थितीत आहे. चांगली लीडरशिप असलेली टीम आणि पुढे जाण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे. कंपनी सक्षम हातात आहे हे जाणून मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे", असे बिन्नी बन्सल यांनी एका निवेदनात म्हटले.

काय करणार OppDoor?

माहितीनुसार, OppDoor ही कंपनी ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांचे कार्य जागतिक पातळीवर नेण्यास मदत करेल. ई-कॉमर्स कंपन्यांना डिझाईन, उत्पादन, मानव संसाधन आणि इतर सेवा प्रदान करेल, ज्यामुळे ते जगभरातील त्यांचे कार्य विस्तारण्यास सक्षम होतील. ही कंपनी सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर आणि मेक्सिको येथील कंपन्यांसोबत काम करेल.

....म्हणून 5 वर्षांनंतर नवीन कंपनी

बिन्नी यांनी 2018 मध्ये फ्लिपकार्ट वॉलमार्टला विकले. त्यावेळी बिन्नी यांचा वॉलमार्टसोबत करार झाला होता की ते ई-कॉमर्स क्षेत्रात 5 वर्षांपर्यंत कोणतीही नवीन कंपनी सुरू करू शकत नाहीत. यामुळेच त्यांनी फ्लिपकार्ट विकल्यानंतर 5 वर्षांनी त्यांची नवीन कंपनी सुरू केली आहे. सध्या तरी फ्लिपकार्ट आणि बिन्नी यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सचिन बन्सल यांचे Navi

दुसरीकडे, सचिन बन्सल यांनी 2018 मध्येच वॉलमार्टने फ्लिपकार्टच्या अधिग्रहणास सुरूवात केली तेव्हाच फ्लिपकार्ट सोडले आणि आता ते स्वतःचा फिनटेक उपक्रम Navi उभारत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी