महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय 
राष्ट्रीय

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

देशातील सहा महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या तक्रारीनंतर

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ प्रकरणात सोमवारी (दि. ३) दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी अश्विनी पंवार यांनी हा निकाल दिला.

दोन्ही आरोपी निर्दोष

अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने ३० जुलै रोजी निकाल राखून ठेवला होता. सोमवारी निकाल जाहीर करत न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह आणि या प्रकरणातील सहआरोपी आणि WFIचे माजी सहसचिव विनोद तोमर यांनाही न्यायालयाने सर्व आरोपांतून मुक्त केले. खटल्यादरम्यान दोन्ही आरोपी जामिनावर बाहेर होते.

'...तर फाशी घेतली असती'

निकालानंतर माध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले, "पहिल्याच दिवशी मी सांगितले होते की, माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतःला फाशी देईन. न्यायालयाने मला आणि विनोद तोमर यांना सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले आहे. मी न्यायालय आणि माझ्या वकिलांचा आभारी आहे."

तसेच, न्यायालयाचा सविस्तर आदेश वाचल्यानंतरच या प्रकरणावर अधिक भाष्य करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०२३ मध्ये महिला कुस्तीपटूंनी केले होते आरोप

या प्रकरणाची सुरुवात २०२३ मध्ये झाली होती. देशातील सहा महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू करून १५ जून २०२३ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (महिलेचा विनयभंग), ३५४A (लैंगिक छळ), ३५४D (पाठलाग) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) यांसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

२०२४ मध्ये आरोप निश्चित

मे २०२४ मध्ये न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीचे आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सहा तक्रारदारांपैकी एका महिलेने केलेल्या आरोपांमधून त्यांची मुक्तता करण्यात आली होती. त्याचप्रमाणे WFIचे माजी सहसचिव विनोद तोमर यांच्याविरोधातही आरोप निश्चित करण्यात आले होते.

देशभर गाजले होते आंदोलन

या प्रकरणामुळे २०२३ मध्ये देशभर मोठे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील वादळ निर्माण झाले होते. भारतातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर येथे दीर्घकाळ आंदोलन करत बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती.

या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

दिल्ली पोलिसांची कठोर शिक्षेची मागणी

अंतिम सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आरोप गंभीर असल्याचा युक्तिवाद केला होता. तक्रारदार महिला कुस्तीपटूंच्या जबाबांसह इतर पुराव्यांच्या आधारे दोषसिद्धी व्हावी, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली होती.

मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.

सविस्तर आदेशाची प्रतीक्षा

निकाल जाहीर झाला असला तरी न्यायालयाचा कारणांसह (Reasoned Order) सविस्तर लेखी आदेश अद्याप उपलब्ध झालेला नाही. या आदेशानंतरच न्यायालयाने कोणत्या कारणांच्या आधारे दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले, हे स्पष्ट होणार आहे.

या निकालामुळे गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ‘शताब्दी’ला एनएबीएच मानांकन; पालिकेचे पहिले सामान्य रुग्णालय ठरले

Pune : बनावट कॉल सेंटरवर ईडीची कारवाई

कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची तक्रार; जनरलच्या डब्यात 'पार्सल'वाल्यांची घुसखोरी

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका