राष्ट्रीय

CA परीक्षांचा निकाल जाहीर: दिल्लीचा शिवम मिश्रा देशात पहिला; मुंबई, नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची बाजी

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्रा याने ५०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. तर दिल्लीच्या वर्षा अरोरा हिने ४८० गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच मुंबईच्या किरण राजेंद्र सिंग आणि नवी मुंबईच्या घिलमान सलीम अन्सारी या दोघांनी तिसरा क्रमांक मिळवत सीए परीक्षेत बाजी मारली आहे.

आयसीएआयने मे महिन्यात घेतलेल्या सीए फायनल परीक्षेच्या गट-१ ची ७४ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २० हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २७.३५ आहे. तर गट-२ ची परीक्षा ५८ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २१ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या गटाचा निकाल ३६.३५ टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे गट-१ आणि गट-२ या दोन्ही गटाची परीक्षा ३५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी केवळ ७ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १९.८८ टक्के आहे.

सीए इंटरमीडिएट परीक्षेत भिवाडी येथील कुशाग्र रॉय याने ५३८ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले आहे. तर अकोला शहरातील युग सचिन कारिया आणि भाईंदर शहरातील यज्ञ ललित चांडक याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. या दोघांनाही ५२६ गुण मिळाले आहेत. तिसरा क्रमांक दिल्लीचा मनितसिंग भाटिया आणि मुंबईच्या हिरेश काशिरामका यांनी पटकावला असून त्यांना ५१९ गुण मिळाले आहेत. सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या गट-१ साठी १ लाख १७ हजार ७६४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी केवळ ३१ हजार ९७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ७१ हजार १४५ विद्यार्थ्यांनी गट-२ ची परीक्षा दिली होती, त्यापैकी केवळ १३ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही गटातील ५९ हजार ९५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ११ हजार ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली