नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी उच्चस्तरीय नोकरशाहीत मोठे बदल केले आहेत. ज्येष्ठ आयएएस अधिकारी अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिवपदी, तर नागरी हवाई उड्डाण खात्याच्या सचिवपदी समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने श्रीवास्तव यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला. अरविंद श्रीवास्तव हे १९९४ च्या कर्नाटक तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते, तर नागरी हवाई उड्डाण खात्याच्या सचिवपदी समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती केली, तर खर्च विभागाच्या सचिवपदी वुमलुंमंग वलुनाम यांची नियुक्ती झाली. १९९४ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले विवेक अग्रवाल हे सांस्कृतिक खात्याचे सचिव बनले आहेत. अग्रवाल सध्या वित्त गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
पंतप्रधान कार्यालयात असलेल्या दोन अधिकाऱ्यांसह १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध विभागांत बदल्या करण्यात आल्या आहेत.
हरी रंजन राव हे मध्य प्रदेशच्या तुकडीचे आयएएस असून त्यांची नियुक्ती क्रीडा खात्यात सचिव म्हणून झाली. राव सध्या पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत आहेत.
कॉर्पोरेट व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव अनुराधा ठाकूर यांची अर्थ व्यवहार विभागात विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती झाली. अनुराधा ठाकूर या येत्या ३० जून रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
राजेश अग्रवाल हे व्यापार खात्यात अतिरिक्त सचिव आहेत. त्यांची नियुक्ती व्यापार खात्यात विशेष सचिव म्हणून झाली. येत्या ३० सप्टेंबर रोजी या खात्याचा पदभार ते स्वीकारतील.
आयएएस अधिकारी के. मोसेस चलाई यांची नियुक्ती सार्वजनिक उद्योगाचे सचिव म्हणून झाली. गोविल या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती कामगार व रोजगार खात्याचे सचिव म्हणून झाली. आशिष श्रीवास्तव हे सध्या सल्लागार आहेत, त्यांची नियुक्ती आंतरराज्य परिषद सचिवालयाच्या सचिवपदी झाली.
क्रीडा व्यवहार सचिव मीता लोचन यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. राज्यसभा सचिवालयात सचिव रजीत पुन्हानी यांची कौशल्य विकास खात्याच्या सचिवपदी नियुक्ती झाली.
निकुंजा बिहारी ढाल यांची नियुक्ती संसदीय कार्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. राकेश कुमार वर्मा हे भारत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महासंचालकपदी असतील. संतोष कुमार सरंगी हे नवीन व पुर्नभरण ऊर्जाच्या खात्याच्या सचिवपदी असतील.
पेट्रोलियम खात्याच्या महासंचालक पल्लवी जैन यांची बदली क्रीडा व्यवहार खात्याचे सचिव म्हणून झाली. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सरचिटणीस भारत लाल यांच्या सेवा विस्ताराला सरकारने मंजुरी दिली.
बंदर व नौकानयन विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार सिन्हा यांना त्याच खात्यात विशेष सचिव बनवले आहे, तर रंजना चोप्रा यांना अर्थ खात्यात विशेष सचिव व वित्तीय सल्लागार म्हणून नेमले आहे.