बोत्सवाना : आफ्रिकेतील बोत्सवाना येथून दोन टप्प्यात एकूण ८ चित्ते भारतात आणले जाणार असून त्यापैकी ४ चित्ते मे महिन्यात भारतात येतील, अशी माहिती वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. या चित्त्यांना टप्प्याटप्प्याने गांधी सागर अभयारण्यात स्थलांतरित केले जाणार आहे.
मध्य प्रदेश सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या चित्ता प्रकल्प आढावा बैठकीला हे अधिकारी उपस्थित होते.
एनटीसीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत ११२ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे, त्यातील ६७ टक्के खर्च हा मध्य प्रदेशातील चित्ता पुनर्वसनासाठी केला गेला आहे. "चित्ता प्रकल्पांतर्गत, चित्त्यांना आता टप्प्याटप्प्याने गांधी सागर अभयारण्यात स्थलांतरित केले जाईल.
हे अभयारण्य राजस्थानच्या सीमेला लागून आहे. यासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्यात आंतरराज्य चित्ता संवर्धन क्षेत्र स्थापन करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे.
तसेच कुनो नॅशनल पार्क आणि गांधीसागर अभयारण्यातील 'चित्ता मित्रांना' विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये २६ चित्ते आहेत, यातील १६ चित्ते खुल्या जंगलात आणि १० पुनर्वसन केंद्रात आहेत. ज्वाला, आशा, गामिनी आणि वीरा यासारख्या मादी चित्यांनी पिल्लांना जन्म दिला आहे. गेल्या दोन वर्षांत कॅम्पमधील पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये कुनोमध्ये ५ मादी आणि ३ नर चित्ते सोडण्यात आले. त्यांना नामिबिया येथून आणण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये आणखी १२ चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथे आणण्यात आले होते. कुनो नॅशनल पार्कमध्ये २६ चित्ते आहेत. त्यात भारतात जन्मलेल्या १४ बछड्यांचा समावेश आहे.
करारावर सहमती
दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि केनिया येथून आणखी चित्ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन टप्प्यांत ८ चित्ते भारतात आणले जातील. मे महिन्यापर्यंत बोत्सवाना येथून ४ चित्त्यांना भारतात आणण्याची योजना आहे. त्यानंतर आणखी ४ चित्त्यांना आणण्यात येईल. याबाबत भारत आणि केनिया यांच्यातील करारावर सहमती झाली आहे, असे एनटीसीए अधिकाऱ्यांनी सांगितले.