नवी दिल्ली : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान झालेल्या बूट फेक प्रकरणानंतर खुद्द सरन्यायाधीशांनी या घटनेवर गुरुवारी प्रथमच भाष्य केले. “सोमवारी घडलेल्या घटनेने मला आणि माझ्या विद्वान सहकाऱ्यांना मोठा धक्काच बसला. मात्र, आता हा आमच्यासाठी एक संपलेला अध्याय आहे,” असे गवई यांनी सांगितले.
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “माझ्या भावाला आणि मला सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. माझ्यासाठी हे प्रकरण आता विस्मृतीत गेले आहे.” सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आरोपी वकील राकेश किशोर यांच्यावर कारवाई करण्यास नकार दिला आहे. मात्र, या घटनेवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी सांगितले की, “ते देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, हा काही विनोदाचा विषय नाही. ही घटना केवळ व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण संस्थेवर प्रहार आहे.” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, “ही घटना अक्षम्य आहे. मात्र, न्यायालयाने दाखवलेला संयम आणि उदारता प्रेरणादायक आहे. पण आता स्वत: गवईंनी यावर आपली चुप्पी तोडली आहे, पण त्यांनी या घटनेला विसरण्याचाही प्रयत्न केला आहे.”
दरम्यान, बंगळुरूमधील ‘ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशन’ने राकेश किशोर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. बंगळुरू पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १३२ आणि १३३ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर (७१) यांचे सदस्यत्व ‘सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन’ने (एससीबीए) गुरुवारी तत्काळ प्रभावाने रद्द केले. “वकिलाचे वर्तन व्यावसायिक नीतिमत्ता, शिष्टाचार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन आहे,” असे ‘सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन’ने म्हटले आहे.
“सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेचा मी निषेध करतो. परंतु त्याच वेळी, मी हेही सांगू इच्छितो की न्यायाधीशांनी न्यायालयात जास्त बोलल्यानेच अशा घटना घडतात. जास्त बोलणारा न्यायाधीश हा एका बेसूर झांजासारखा असतो. न्यायाधीशांचे काम न्यायालयात बोलणे नव्हे, तर ऐकणे आणि नंतर त्यांना जे योग्य वाटेल ते ठरवणे आहे,” असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी गुरुवारी अनोख्या पद्धतीने या घटनेचा निषेध नोंदवला. नीलेश लंके यांनी थेट वकील राकेश किशोर यांच्या नवी दिल्लीतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. लंकेंनी वकिलाला संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भेट देत त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.