नवी दिल्ली : ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी भारत आणि चीनमधील संबंधांबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची लक्षणे दिसत आहेत. चीनपासून भारताला धोका नाही. भारत आणि चीनमधील वाद अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडला जातो, असा दावा त्यांनी केला. भारताने या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र, दोन्ही देशांनी आता सहकार्याच्या मार्गावरून पुढे गेले पाहिजे, असे सॅम पित्रोदा म्हणाले.
भारत आणि चीनमधील सीमारेषा ही जगातील सर्वात वादग्रस्त सीमांपैकी एक आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे या सीमेवर वारंवार वादही निर्माण होत असतात. गलवान खोऱ्यामध्ये पाच वर्षांपूर्वी भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये भीषण झटापट होऊन त्यात दोन्हीकडच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता. असे असतानाही जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेले पाहिजे. आपले धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचे राहिले आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो, मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटुता निर्माण होते. त्यामुळे आपण आपली ही मानसिकता बदलली पाहिजे, असे पित्रोदा म्हणाले.
पित्रोदांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत - काँग्रेस
सॅम पित्रोदा यांचे चीनबाबतचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून ते पक्षाचे मत नाही, असे काँग्रेसने सोमवारी स्पष्ट केले. सॅम पित्रोदा यांनी चीनबद्दल व्यक्त केलेले विचार निश्चितच राष्ट्रीय काँग्रेसचे विचार नाहीत. चीन हा देशाचे परराष्ट्र धोरण, बाह्य सुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी आव्हान आहे. काँग्रेसने मोदी सरकारच्या चीनबद्दलच्या दृष्टिकोनावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. १९ जून २०२० रोजी पंतप्रधानांनी त्यांना जाहीर ‘क्लीनचिट’ दिली होती. चीनबद्दल आमचे सर्वात अलीकडील विधान २८ जानेवारी २०२५ रोजी होते. संसदेमध्येही चर्चा करण्याची आणि या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सामूहिक संकल्प व्यक्त करण्याची संधी नाकारली जात आहे हेदेखील अत्यंत खेदजनक आहे, अशी पोस्ट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केली आहे.
धोका काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनपासून निर्माण होणाऱ्या धोक्याला रोखण्यात यशस्वी होतील का, असे विचारले असता सॅम पित्रोदा म्हणाले की, चीनपासून काय धोका आहे हे मला समजत नाही. अमेरिकाही शत्रू निश्चित करण्याचे धोरण अवलंबतो. त्यामुळे भारत आणि चीनमधील वादाला नेहमी अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडले जाते. चीन सुरुवातीपासून आपला शत्रू आहे, हे समजणे बंद केले पाहिजे. ही भूमिका केवळ चीनबाबत नाही तर सर्व देशांबाबत असली पाहिजे.