नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (दि. १०) दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतले. दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धुरा पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, दिपके यांचा यासंदर्भातील व्हिडीओ समोर आला असून, त्यांच्या अटकेनंतरही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका सीजेपीने घेतली आहे.
आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे
अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे ताब्यात असेपर्यंत अजिंक्य शिंदे जंतर-मंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व करतील, असे सीजेपीकडून सांगण्यात आले. संभाव्य अटकेची शक्यता लक्षात घेऊन दिपके यांनी शुक्रवारी रात्रीच एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच स्थानिक नागरिकांना होणारी संभाव्य गैरसोय यांचा दाखला देत आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, जंतर-मंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण असल्याचे सांगत दिपके यांनी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तसेच, तरुणांना दिल्लीला येण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकार सुरक्षा निर्बंधांचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
कोण आहेत अजिंक्य शिंदे?
अजिंक्य शिंदे हे ३५ वर्षीय असून, ते महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून (DBATU) बी.टेक. पदवी प्राप्त केली आहे. ऑगस्ट महिन्यात अभिजीत दिपके यांनी शिंदे यांची पक्षाच्या राष्ट्रीय संघटन प्रभारीपदी नियुक्ती केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाचे आयोजनही शिंदे यांनी केले होते. तसेच, देशभरातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या पक्षाच्या 'स्कूल ठीक करो' मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सीजेपीच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.
'ते तुम्हाला जिथे रोखतील, तेच तुमचे जंतर-मंतर'
दरम्यान, सीजेपीकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अजिंक्य शिंदे यांनी समर्थकांना जंतर-मंतरच्या दिशेने कूच करण्याचे आवाहन केले आहे. "आम्ही सर्वांना जंतर-मंतरच्या दिशेने मार्च करण्याचे आवाहन करतो. दिल्ली पोलिसांनी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला जिथे रोखतील, तेच तुमचे जंतर-मंतर असेल," असे शिंदे यांनी व्हिडीओत म्हटले आहे. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे.
दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणारे आंदोलन रोखण्यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. विविध चौक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जात असून, अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
आंदोलकांसह कंटेंट क्रिएटर्सनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यूट्यूबर ध्रुव राठी यालाही गुरुग्राममधील त्याच्या निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत निर्बंध आणि बदल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळपासून काही मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती आहे.
सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन
एकीकडे दिल्लीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असतानाच दुसरीकडे दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे आज सकाळी निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माहितीनुसार, सावित्रीबाई दिपके यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय हिंगोलीतील संतुक पिंपरी येथे जाणार आहेत. अभिजीत दिपके हेदेखील आजींच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीतून महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. मात्र, ते सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना गावी परतण्यासाठी परवानगी मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे अभिजीत दिपके आजींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार का, याकडे लक्ष लागले आहे.