नवी दिल्ली : नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या प्रकारानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसह मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासाबाहेर जोरदार धरणे आंदोलन करीत ठिय्या दिला. रात्री उशिरा राहुल, प्रियांका गांधी तसेच अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.
तीन तासांहून जास्त काळ राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही राहुल गांधींनी त्यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरचे आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून काँग्रेसचे खासदार हटत नसल्याचे दिसताच दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली. सुरुवातीला त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांनाही ताब्यात घेतले.
राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर महिला पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रतिकार केल्याचे दिसून आले. या आंदोलनानंतर 'एक्स'वर पोस्ट करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्याबाबत उत्तर मागण्यासाठी आम्ही मोदींच्या घराकडे मोर्चा काढला होता. हे सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारू इच्छित नाही आणि या विषयावर संसदेत चर्चा करण्यासही तयार नाही भारतातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे.
नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस अत्याचाराबद्दल त्यांची माफी मागितली पाहिजे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात राहुल गांधी म्हणाले की, मी इतर खासदारांसह सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षाला विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करायची असल्याचे सांगितले. यावर अध्यक्षांनी मला सांगितले की, यासाठी त्यांना सरकारला विचारावे लागेल. म्हणजे संसदेत वादविवाद किंवा चर्चा करण्यासाठी अध्यक्षांना सरकारची परवानगी घ्यावी लागते, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, पण विद्यार्थ्यांनी पोलिसांचा मार खाल्ला आहे आणि पोलीस यंत्रणा गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि गृहमंत्री पंतप्रधानांना रिपोर्ट करतात, म्हणून पंतप्रधानांनीही राजीनामा दिला पाहिजे.
चर्चेला सरकार तयार - सिंह
मोदी यांच्या निवासाबाहेर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर, केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत नीट परीक्षा आणि त्यासंबंधित आंदोलनावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यासोबतच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर दिलेला शब्द फिरवल्याचा गंभीर आरोप करत, असे वर्तन एका मोठ्या नेत्याला शोभत नाही, अशी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी भूमिका बदलली
आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी यांची भेट घेणारे जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी आधी संसदेत नीट विषयावर चर्चेची मागणी केली होती. सरकारने ती मागणी मान्य केली असता, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवी अट ठेवत चर्चेपासून माघार घेतली. "राहुल गांधींसारख्या ज्येष्ठ नेत्याने आणि विरोधी पक्षनेत्याने दिलेल्या शब्दावरून मागे हटणे हे अत्यंत दुर्दैवी असून लोकशाहीच्या सर्व मूल्यांच्या विरोधात आहे, असे सिंह म्हणाले.
सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन याच पोलीस ठाण्यात ठेवल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठी सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.