राष्ट्रीय

४० मजूरांना वाचवण्यासाठी थायलंड, नॉर्वेच्या तज्ज्ञांशी संपर्क

नवशक्ती Web Desk

मसुरी : उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या ७० तासांपासून अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बचाव पथकाकडून त्यांना वाचवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. आता उत्तराखंड सरकारने नॉर्वे व थायलंडच्या विशेषज्ज्ञांच्या पथकाकडून मदत घेतली आहे.

७० तासांनंतरही बचाव पथकाने बोगद्यातील मलबा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यमुनोत्री महामार्गावर बनत असलेल्या या बोगद्यात अडकलेल्या मजूरांना वाचवण्यासाठी बचाव पथकाने थायलंडच्या गुफेतील मुलांना वाचवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आहे. या कंपनीने जुलै २०१८ मध्ये फुटबॉल टीमच्या १२ मुलांना व त्यांच्या प्रशिक्षकाला वाचवले होते. तसेच नॉर्वेच्या एनजीआय या संस्थेशीही संपर्क केला आहे. बोगद्यात बचाव मोहीम कशी राबवायची याचा सल्ला घेतला जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वे, आरवीएनएल, राईटस‌् व इरकॉनच्या तज्ज्ञांचाही सल्ला घेतला जात आहे.

बोगद्याच्या आत सतत मलबा व दगड पडत असल्याने बचाव पथकाच्या कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बचाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आणखी मलबा पडू लागला. मलबा हटवला जाईपर्यंत कामगारांना पाईपच्या सहाय्याने जेवण व पाणी पाठवले जात आहे. तसेच त्यांना औषधे पाठवली जात आहेत.

दरड कोसळल्याने आणखीन अडचणी

घटनास्थळी एक दरड कोसळल्याने बचाव मोहीमेवर मोठा परिणाम झाला. ही मोहीम संथ गतीने चालत असल्याने अन्य मजूरांनी जोरदार आंदोलन केले. काही मजुरांनी बॅरिकेडस‌् तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. ड्रिलींग मशीनच्या सहाय्याने अडकलेल्या मजुरांसाठी रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. २१ मीटरपर्यंत मलबा हटवला असून आणखी १९ मीटर बाकी आहे.

२४ तास मोहीम

राष्ट्रीय हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, बीआरओ व राष्ट्रीय महामार्गाचे २०० जण २४ तास बचाव मोहीम राबवत आहेत. बोगद्यात अडकलेले मजूर हे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचे आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस