नवी दिल्ली : माजी सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी गुरुवारी दिल्ली पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगासंदर्भातील सोशल मीडिया पोस्टप्रकरणी दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तब्बल नऊ तास चौकशी केली. या काळात आपल्या कुटुंबीयांना किंवा पत्नीला कोणतीही माहिती दिली नाही आणि आपल्यालाही संपर्क साधू दिला नाही, असा दावा जोशी यांनी केला.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी जोशी यांची निवडणूक आयोगाशी संबंधित एका प्रकरणात चौकशी केली होती. मॉर्निंग वॉक दरम्यान त्यांना "फार कमी वेळ लागेल" असे सांगून चौकशीसाठी नेण्यात आले. मात्र, न्यू फ्रेंड्स कॉलनी येथील काउंटर-इंटेलिजन्स युनिटच्या कार्यालयाबाहेर जोशी यांच्या सुटकेची मागणी करत नागरिकांनी गर्दी केल्यानंतर, संध्याकाळी ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले.