नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातील ११ राज्यांमध्ये कोरोना पसरू लागल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत देशात कोरोनाचे २५७ सक्रिय रुग्ण असून गुजरातमध्ये सात तर केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे ९५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरयाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि कर्नाटक या ११ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते कोरोनाची ही नवीन स्ट्रेन आतापर्यंत जितकी पसरली त्यावरून समजते की, ती कोविड १९च्या पहिल्या आणि दुसऱ्या म्युटेशन्सइतकी संसर्गजन्य नसेल. परंतु इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी अधिक सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमागे इतरही आरोग्याची कारणे सांगितली गेली आहेत. मृतांमध्ये ५९ वर्षीय पुरुष कर्करोगाने ग्रस्त होता, तर दुसरी मृत १४ वर्षांची मुलगी होती, जी आरोग्याच्या इतर समस्यांनी ग्रस्त होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तिथे सक्रिय रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. यापैकी ६९ प्रकरणे नवीन आहेत. तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे सध्या ६६ सक्रिय प्रकरणे आहेत. त्यापैकी ३४ रुग्ण नवीन आहेत. यानंतर महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५६ आहे. ज्यामध्ये ४४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हा तामिळनाडूपेक्षा पुढे आहे.
गुजरातमध्ये कोरोनाचे सात सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पुद्दुचेरीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. तिथे सध्या १० सक्रिय रुग्ण आहेत, तर तीन रुग्ण पूर्णपणे निरोगी असल्याचे घोषित करण्यात आले आहेत. हरयाणामध्येही कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन प्रकरणे नवीन आहेत. आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने केंद्र सरकारने १२ मे पासून पुन्हा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना देशातील ११ राज्यांमध्ये पसरला आहे.