राष्ट्रीय

केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ; 'आप'ला संपवले जात असल्याचा आरोप

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या अबकारी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत गुरुवारी न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत वाढ केली. ईडीने केजरीवाल यांच्या कोठडीत आणखी आठ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती, पण न्यायालयाने चार दिवसांचीच वाढ करून दिली.

न्यायालयातील युक्तिवादादरम्यान केजरीवाल यांनी म्हटले की, ‘जर अबकारी धोरण ठरवण्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल, तर हा पैसा गेला कुठे? केंद्र सरकार आणि ईडी केवळ आम आदमी पक्षाला (आप) त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वरवरच्या आणि दिखाऊ कारणांवरून अटक केली आहे. कोणत्याही न्यायालयाने मला अद्याप दोषी ठरवलेले नाही.’ यावर ईडीने उत्तर दिले की, दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात मिळालेला पैसा आपने गोवा निवडणुकीत लाच देण्यासाठी वापरला, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी आरोप केला की, अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बरी नसतानाही केंद्र सरकार आणि ईडी त्यांना विनाकारण त्रास देत आहे. दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना यांनी बुधवारी ‘मी दिल्लीच्या नागरिकांना आश्वस्त करतो की, दिल्लीचे सरकार तुरुंगातून चालवू दिले जाणार नाही’, असे म्हटले होते. त्यावर केजरीवाल यांनी गुरुवारी पलटवार केला की, हा राजकीय कट असून, त्याला नागरिकच उत्तर देतील.

अमेरिकेच्या वक्तव्याचा पुन्हा निषेध

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अमेरिकी परराष्ट्र खात्याकडून पुनश्च केलेल्या वक्तव्याचा भारताने गुरुवारी पुन्हा एकदा तीव्र निषेध केला. अमेरिकेचे वक्तव्य पूर्णपणे अस्वीकारार्ह आणि अनावश्यक आहे. भारतात कायद्याचे राज्य आहे आणि येथील न्यायालयीन प्रक्रिया केवळ कायद्यानुसारच चालतात. बाहेरच्या कोणीही त्यावर चुकीची टिप्पणी करणे चालणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस