दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका देत त्यांचा भाजप नेते प्रवेश सिंग (वर्मा) यांनी पराभव केला. केजरीवाल यांच्या पराभवानंतर प्रवेश सिंग (वर्मा) कोण आहेत आणि त्यांची संपत्ती किती आहे याची चर्चा सुरू आहे.
कोण आहेत प्रवेश सिंग (वर्मा)?
प्रवेश सिंग (वर्मा) हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. प्रवेश सिंग (वर्मा) यांचा जन्म 1977 मध्ये झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण आर के पूरम येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथून घेतले. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून कला विषयात पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले. त्यांनी 2013 मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
किती आहे प्रवेश सिंग (वर्मा) यांची संपत्ती?
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रवेश सिंग (वर्मा) यांची एकूण मालमत्ता 95 कोटी रुपयांची आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 77 कोटी 89 लाख रुपये आहे. प्रवेश सिंग (वर्मा) यांच्याकडे 11 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता देखील आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 6 कोटी 91 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
प्रवेश सिंग (वर्मा) यांच्याकडे कॅश आणि कार किती आहेत?
प्रवेश सिंग (वर्मा) यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात व्यवसाय आणि समाजसेवा यांना आपल्या उत्पन्नाचा स्रोत दाखवले आहे. वर्मा यांच्याकडे जवळपास 2.2 लाख रुपयांची कॅश असून त्यांच्याजवळ तीन कार आहेत. यामध्ये 9 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर, 36 लाख रुपयांची टोयोटा इनोवा आणि 11.77 लाख रुपयांची महिंद्रा XUV यांचा समावेश आहे.
प्रवेश सिंग (वर्मा) यांच्या कुटुंबाकडे आहे 'इतके' सोने
प्रवेश सिंग (वर्मा) यांच्या कुटुंबाकडे जवळपास 72 लाख रुपयांचे सोने आहे. यामध्ये त्यांच्या स्वतःकडे 8.25 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोने आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 45.75 लाख रुपये किमतीचे 1.11 किलोग्रॅम इतके सोने आहे. प्रवेश वर्मा यांना दोन मुलींजवळ 12.35 लाख रुपयांचे 300 ग्रॅम सोने आहे. तर त्यांच्या मुलाजवळ 6.17 लाख रुपयांचे 150 ग्रॅम इतके सोने आहे.
प्रवेश सिंग (वर्मा) यांच्यावर आहे इतक्या कोटींचे कर्ज
प्रवेश सिंग (वर्मा) यांच्यावर 62 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये त्यांनी भाऊ सिद्धार्थ सिंह यांच्याकडून घेतलेले 22 कोटी 59 रुपयांचे वैयक्तिक कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 11 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश सिंग (वर्मा) यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात जास्त प्रवेश सिंग (वर्मा) यांच्या नावाची चर्चा आहे. दिल्ली निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरळ टक्कर देत त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना 'जायंट किलर' म्हणून संबोधले जात आहे. दिल्लीत जाट आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे. प्रवेश सिंग (वर्मा) हे जाट समुदायतून येतात. त्यामुळे देखील त्यांच्या नावाचा विचार प्रामुख्याने केला जात आहे. तसेच जाट आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रवेश सिंग (वर्मा) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका देखील केली होती.