दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुरक्षित  (Photo-X)
राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुरक्षित

SpiceJet hits Akasa Plane Delhi Airport : दिल्लीच्या IGI विमानतळावर अकासा एअर आणि स्पाइसजेटच्या विमानांमध्ये टॅक्सींगदरम्यान धडक झाली असून दोन्ही विमानांचे नुकसान झाले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येथे गुरुवारी (दि.१६) सायंकाळी अकासा एअर (Akasa Air) आणि स्पाइसजेट (SpiceJet) यांच्या विमानांमध्ये धडक झाल्याची घटना समोर आली आहे. धावपट्टीवर टॅक्सींग (विमान पार्किंगची जागा) करत असताना दोन्ही विमाने एकमेकांना घासल्याने मोठा गोंधळ उडाला. या घटनेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले असले तरी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

टॅक्सींगदरम्यान घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचे बोईंग ७३७-७०० विमान उड्डाणाच्या तयारीत असताना टॅक्सींगदरम्यान स्थिर असलेल्या अकासा एअरच्या विमानाला धडकले. दुपारी जवळपास २ वाजून १५ च्या सुमारास टर्मिनल १ वर ही दुर्घटना घडली. या धडकेत स्पाइसजेटच्या विमानाच्या उजव्या विंगलेटला (पंखाच्या टोकाचा भाग) नुकसान झाले, तर अकासा एअरच्या विमानाच्या डाव्या बाजूच्या हॉरिझॉन्टल स्टॅबिलायझरला (शेवटचा भाग) हानी पोहोचली.

हैदराबाद उड्डाणावर परिणाम

अकासा एअरचे हे विमान दिल्लीहून हैदराबादकडे जाणाऱ्या QP १४०६ उड्डाणासाठी नियोजित होते. धडकेनंतर विमान तपासणीसाठी परत बे-एरियात अर्थात पार्किंग/तपासणीच्या जागी नेण्यात आले. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून, त्यांच्यासाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.

दोन्ही विमानांची तपासणी सुरू

स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विमानाला झालेल्या नुकसानीनंतर ते सध्या दिल्ली विमानतळावरच स्थिर ठेवण्यात आले आहे. दोन्ही विमानांची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू असून आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच त्यांना प्रवासासाठी वापरले जाणार आहे.

सुरक्षा प्रोटोकॉल तात्काळ लागू

घटनेनंतर विमानतळावरील तांत्रिक आणि ग्राउंड स्टाफने तातडीने नुकसानाचे मूल्यमापन सुरू केले. तज्ज्ञांच्या मते, टॅक्सींगदरम्यान अशा घटना गर्दीच्या परिसरात कधीतरी घडू शकतात.

DGCAकडून तपास

या घटनेबाबत Directorate General of Civil Aviation (DGCA) कडून अजून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून ही चूक पायलटची होती की ग्राऊंड स्टाफची, याचा तपास सुरू आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान, ऐन प्रवासाच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट