Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप 
राष्ट्रीय

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

अंकित शर्मा यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली असून दोषींनी कोणतीही दया दाखवली नव्हती, त्यामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : २०२० मधील दिल्ली दंगलीदरम्यान गुप्तचर विभाग (IB) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी (दि. ३१) करकरडूमा न्यायालयाने माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंगलीच्या पार्श्वभूमीवर धर्माच्या आधारावर अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निर्णय दिला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी शिक्षेचा निर्णय देताना हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याने संपूर्ण समाज हादरला, असे नमूद केले.

सरकारी पक्षाची कठोर भूमिका

शिक्षेच्या सुनावणीपूर्वी दिल्ली पोलिसांनी पाचही दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील विशेष सरकारी वकील मधुकर पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना अंकित शर्मा यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली असून दोषींनी कोणतीही दया दाखवली नव्हती, त्यामुळे त्यांच्याबाबतही कोणतीही सहानुभूती दाखवू नये, अशी भूमिका मांडली.

फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा

"आज दयेची मागणी करणाऱ्यांनी त्यावेळी दया दाखवली असती तर ही वेळ आली नसती. अंकित शर्मा यांना रुग्णालयात नेण्याचाही प्रयत्न करण्यात आला नाही," असेही सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. मात्र, दोषींमध्ये सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही, हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही, असे न्यायालयाने नमूद करत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कोणत्या कलमांखाली दोषी ठरवले?

माध्यमांच्या वृत्तानुसार, न्यायालयाने ताहीर हुसेन याला भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (शासकीय आदेशाचे उल्लंघन), १५३अ (समाजात तेढ निर्माण करणे), १४७ (दंगल), १४८ (घातक शस्त्रासह दंगल), १४९ (बेकायदेशीर जमाव), ३६५ (अपहरण करून बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याचा हेतू) आणि ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवले. याच प्रकरणात नाझिर, असीम, जावेद आणि अनस यांनाही याच कलमांखाली दोषी ठरवण्यात आले.

अंकित शर्मा यांच्या वडिलांनी तक्रारीत काय म्हटले होते?

या प्रकरणातील एफआयआर २६ फेब्रुवारी २०२० रोजी अंकित शर्मा यांचे वडील रवींद्र कुमार यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ आणि विरोधातील आंदोलनादरम्यान चांदबाग परिसरात दगडफेक, जाळपोळ, गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.

तक्रारीत रवींद्र कुमार यांनी आरोप केला होता की, त्यावेळी स्थानिक नगरसेवक असलेल्या ताहीर हुसेनने आपल्या कार्यालयात अनेक जणांना एकत्र जमवले होते. तेथून दगडफेक, पेट्रोल बॉम्ब आणि गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मृतदेह नाल्यात सापडल्याचा आरोप

रविंदर कुमार यांच्या तक्रारीनुसार, २५ फेब्रुवारी २०२० रोजी अंकित शर्मा घरगुती सामान खरेदीसाठी बाहेर गेले, मात्र ते परतले नाहीत. त्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह चांदबाग परिसरातील नाल्यात फेकण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेथून अंकित शर्मा यांचा मृतदेह सापडला. तक्रारीत ताहीर हुसेन आणि त्याच्या सहकाऱ्यांवर या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

२०२० च्या दिल्ली दंगलीतील गाजलेले प्रकरण

फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या सांप्रदायिक दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा झाली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम

VIDEO : पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं, पतीने भररस्त्यात पट्टा काढला अन्...