नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इमारती कोसळण्याच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच पहाडगंज परिसरात इमारत कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मंगळवारी (दि. १७) सकाळी शाहदरा येथील विवेक विहारमधील ज्वाला नगर परिसरात जुनी दोन मजली इमारत कोसळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ३ वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला असून, ४ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. माहितीनुसार, मृत आणि जखमी झालेले सर्व जण या इमारतीत भाड्याने राहत होते.
नेमकं काय घडलं?
'पीटीआय'च्या वृत्तानुसार, विवेक विहारमधील ज्वाला नगर परिसरातील गल्ली क्रमांक ६ मध्ये मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजता ही दुर्घटना घडली. तळमजला आणि त्यावर एक मजला असलेली जुनी इमारत अचानक कोसळली. त्यावेळी इमारतीत असलेले ६ जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
३ वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
या दुर्घटनेत लड्डू ऊर्फ देवांश (३) आणि पिंटू (३५) यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी देवांश पहिल्या मजल्यावर, तर पिंटू तळमजल्यावर होता. मृतांची ओळख पटली असून, इतर ४ जण जखमी झाले आहेत.
ढिगाऱ्याखालून ६ जणांना बाहेर काढलं
पोलिसांच्या माहितीनुसार, विवेक विहार पोलिस ठाण्यात सकाळी १० वाजून ९ मिनिटांनी इमारत कोसळल्याचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व ६ जणांना बाहेर काढण्यात आलं.
या सर्वांना सीएटी रुग्णवाहिकांच्या मदतीने उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यापैकी देवांश आणि पिंटू यांचा मृत्यू झाला. उर्वरित चौघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही इमारत सुरेंद्र सिंह यांच्या मालकीची आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्व ६ जण या इमारतीत भाड्याने राहत होते. इमारत नेमकी कशामुळे कोसळली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
दिल्लीत इमारती कोसळण्याच्या घटना सुरूच
दिल्लीमध्ये गेल्या काही महिन्यांत इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी (१५ नोव्हेंबर) पहाडगंज परिसरात इमारत कोसळल्याने काही जण जखमी झाले होते. त्यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील चावडी बाजार परिसरात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून जीवितहानी झाली होती. आता विवेक विहारमधील दुर्घटनेमुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.