यंदाच्या आर्थिक वर्षात १७ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन ३० टक्क्याने वाढून ते ८.३६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. कोरोनाकाळानंतर आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने करभरणा वाढला आहे, असे अर्थखात्याने सांगितले आहे.
१.३५ लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिल्यानंतर प्रत्यक्ष कर महसूल २३ टक्क्याने वाढून तो सात लाख कोटी रुपयांवर गेला आहे. २०२२-२३मध्ये प्रत्यक्ष करांचे संकलन ८.३६,२२५ कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत हेच करसंकलन ६,४२,२८७ कोटी होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष कर संकलनात ३० टक्के वाढ झाली.कॉर्पोरेट प्राप्तीकरातून ४.३६ लाख कोटी रुपये तर वैयक्तिक प्राप्तीकरातून ३.९८ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. सरकारच्या स्थिर धोरणांचा फायदा मिळत आहे. सुलभीकरण व प्रक्रियांचे सुसूत्रीकरण करण्यावर भर दिला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून करगळती रोखण्यात आली आहे, असे अर्थखात्याने सांगितले.
एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान आगाऊ कर संकलन १७ टक्क्याने वाढून २.९५ लाख कोटींवर गेले. तर त्यात कॉर्पोरेट कंपन्यांनी २.२९ लाख कोटींचा आगाऊ कर भरणा केला.