राष्ट्रीय

EDकडून १० हजार कोटींची मालमत्ता जप्त; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

ईडीने बुधवारी चंदिगडस्थित ‘पीएसीएल’ (पर्ल्स ग्रुप) विरोधातील मनी लॉन्डरिंग तपासाअंतर्गत २४७ स्थावर मालमत्तांवर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. या मालमत्तेचे मूल्य १० हजार कोटी रुपये आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ईडीने बुधवारी चंदिगडस्थित ‘पीएसीएल’ (पर्ल्स ग्रुप) विरोधातील मनी लॉन्डरिंग तपासाअंतर्गत २४७ स्थावर मालमत्तांवर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. या मालमत्तेचे मूल्य १० हजार कोटी रुपये आहे.

ईडीच्या निवेदनानुसार, ‘पीएसीएल’ समूहावर सुमारे ४८ हजार कोटींच्या पोंझी घोटाळ्याचा आरोप आहे. ‘पीएमएलए’अंतर्गत तात्पुरती जप्त करण्यात आलेली ही मालमत्ता पंजाबमधील एसएएस नगर (मोहाली), रूपनगर आणि झिरकपूर येथे आहे.

जप्त करण्यात आलेल्या २४७ मालमत्तांचा खरेदी खर्च गुंतवणूकदारांच्या निधीतून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे ईडीने स्पष्ट केले. या मालमत्तांचे एकूण मूल्य १०,०२१.४६ कोटी रुपये असल्याचेही एजन्सीने सांगितले.

मूल्य आणि मालमत्तांच्या संख्येच्या दृष्टीने हा एकाच प्रकरणातील सर्वात मोठा जप्ती आदेश असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी नमूद केले. यापूर्वी काही प्रकरणांत अधिक मूल्याची मालमत्ता जप्त झाली असली, तरी ती विविध प्रकरणांशी संबंधित होती; एकमेव प्रकरणाशी संबंधित नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईडीचा हा तपास फेब्रुवारी २०१४ मध्ये सीबीआयने ‘पीएसीएल लिमिटेड’चे दिवंगत प्रवर्तक निर्मल सिंग भंगू आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे. भंगू यांचे ऑगस्ट २०२४ मध्ये निधन झाले.

ईडीच्या मते, ‘पीएसीएल’शी संबंधित संस्था आणि व्यक्तींनी कृषी जमीन विक्री व विकासाच्या नावाखाली बेकायदेशीर ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’ राबवून देशभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून ४८ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी फसवणुकीने उभारला. गुंतवणूकदारांना रोख व हप्त्यांच्या योजनांतून गुंतवणुकीस प्रवृत्त करून करारपत्रे, पॉवर ऑफ अॅटर्नी आदी दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांवर सह्या करून घेण्यात आल्या.

बहुसंख्य प्रकरणांत गुंतवणूकदारांना कोणतीही जमीन दिली गेली नाही आणि सुमारे ४८ हजार कोटी रुपये अजूनही परत मिळालेले नाहीत, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणात २०१६ पासून आतापर्यंत ईडीने चार आरोपपत्रे दाखल केली आहेत.

ईडीने आतापर्यंत देशांतर्गत तसेच परदेशातील काही मालमत्तांसह एकूण १७,६१० कोटी रुपयांची चल व स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू