राष्ट्रीय

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री रेड्डी यांना ईडीकडून धक्का; २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.

Swapnil S

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या हैदराबाद विभागाने रेड्डी यांचे २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स तात्पुरते जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. १४ वर्षांपूर्वीच्या जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. हे संपूर्ण प्रकरण ‘क्विड प्रो क्वो’ गुंतवणुकीच्या संदर्भातील असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने केलेली तात्पुरती जप्ती ही २०११ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पहिल्यांदा नोंदवलेल्या एका प्रकरणासंदर्भात असून हे संपूर्ण प्रकरण ‘क्विड प्रो क्वो’ गुंतवणुकीशी संबंधित आहे, असे कळते.

दरम्यान, सीबीआय आणि ईडीच्या तपासात असे आढळून आले की, ‘डीसीबीएल’ने यापूर्वी रेड्डी यांच्याशी संबंधित कंपनी रघुराम सिमेंट्स लिमिटेडमध्ये ९५ कोटी रुपये गुंतवले होते. त्या बदल्यात कडप्पा जिल्ह्यात ४०७ हेक्टर खाण भाडेपट्टा मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आलेला होता. या प्रकरणात २०१३ मध्ये सीबीआयने रेड्डी, ‘डीसीबीएल’ आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात ईश्वर सिमेंट्सच्या खाणकामाच्या जमिनीचे ‘डीसीबीएल’ला हस्तांतरण करण्याचाही समावेश आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, रेड्डी यांच्या वडिलांनी दालमिया सिमेंट्सला मदत केल्याचा आरोप आहे. रेड्डी यांनी त्यांचे जवळचे सहकारी व्ही. विजया साई रेड्डी आणि पुनीत दालमिया यांच्यासह रघुराम सिमेंट्स लिमिटेडमधील त्यांचे शेअर्स एका फ्रेंच कंपनीला विकण्याचा करार केला होता. हा करार १३५ कोटी रुपयांना झालाn होता. यापैकी ५५ कोटी रुपये जगन रेड्डी यांना हवालाद्वारे रोख स्वरूपात देण्यात आल्याचा आरोप आहे. हे सर्व व्यवहार १६ मे २०१० ते १३ जून २०११ या दरम्यान झाल्याचा आरोप आहे.

दालमिया सिमेंट्सची ३७७ कोटींची जमीन जप्त

ईडीने केलेल्या या कारवाईत रेड्डी यांचे तीन कंपन्यांमधील २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले आहेत. रेड्डी यांचे शेअर्स जप्त करण्याच्या कारवाईबरोबरच ईडीने त्याच प्रकरणात दालमिया सिमेंट्स (भारत) लिमिटेडच्या (डीसीबीएल) मालकीची ३७७.२ कोटी रुपयांची जमीनही जप्त केली आहे. ही जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी रुपयांची असल्याचे ‘डीसीबीएल’ने म्हटले आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती