नवी दिल्ली : अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या चौकशी प्रकरणी गुगल, 'मेटा'ला ईडीने समन्स जारी केले आहे. दोन्ही कंपन्यांची २१ जुलै रोजी चौकशी होणार आहे.
'ईडी'ने सांगितले की, गुगल, मेटाने ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या प्रचार व प्रसारासाठी व्यासपीठ दिले. ही सट्टेबाजी आता मनी लॉन्ड्रिंग आणि हवाला आदी गंभीर आर्थिक गुन्ह्यासाठी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या ॲपशी संबंधित संकेतस्थळांना जाहिरातीसाठी या कंपन्यांनी विशेष कालावधी दिला. त्यामुळे या ॲपची लोकप्रियता वेगाने वाढली.
त्यामुळे हा अवैध व्यवसाय संपूर्ण देशात पसरला. हे सट्टेबाजीचे ॲप्स स्वतःला 'कौशल्यपूर्ण गेमिंग व्यासपीठ' समजतात. मात्र, त्यांच्यात अवैधरित्या जुगार चालतो. या ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची काळी कमाई करत होते. ती कमाई हवालामार्फत देशाच्या बाहेर पाठवली जात होती.
ईडीने नुकतीच २९ सेलिब्रेटी व सोशल मीडिया इंफ्लुएंसर्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यात प्रकाश राज, राणा दग्गुबाती आणि विजय देवरकोंडा यांचा समावेश आहे. त्यांनी या ॲपचा प्रचार करून मोठी कमाई केली आहे.