राष्ट्रीय

Election Results 2024: हरयाणात भाजपची हॅटट्रिक; जम्मू-काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस सत्तेवर

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून भाजपने हॅट‌ट्रिक साधली, तर जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश व निकालापूर्वी जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षावरून हरयाणात सत्ताबदल अटळ असल्याची अटकळ बांधली जात होती, मात्र मतदारांनी फासे उलटे टाकल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

प्रस्थापितांविरोधात वातावरण असतानाही अंतर्गत कलहामुळे काँग्रेसला हरयाणा निवडणुकीत राजकीय लाभ उठविता आला नसल्याची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकांपाठोपाठ आता महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात निवडणूक होणार आहे. हरयाणातील निकालामुळे राज्यातील सत्तारूढ महायुतीच्या नेत्यांना बळ प्राप्त झाले असून, राज्यातही अशाच प्रकारच्या निकालाची पुनरावृत्ती होणार असल्याचा त्यांना विश्वास वाटत आहे, तर दुसरीकडे हरयाणातील निकालामुळे महाविकास आघाडी धास्तावली असल्याची चर्चा आहे.

हरयाणात दसऱ्याला शपथविधी

विविध संस्थांनी केलेले मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष फोल ठरवत हरयाणात भाजप विजयाची हॅटट्रिक करीत सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. या निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ९० पैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने (इंडिया आघाडी) ४९ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे, तर भाजपने २९ जागांवर विजय मिळविला असून अन्य उमेदवारांनी १२ जागा पटकावल्या आहेत.

सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच हरयाणात काँग्रेस तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स विजयी आकडा गाठणार, असे कल दिसू लागताच दोन्ही ठिकाणी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. ढोल-ताशे, मिठाई वाटपही सुरू करण्यात आले. मात्र मतमोजणीच्या फेऱ्यांची संख्या वाढत जाताच हरयाणातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळत चालला. त्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी, निवडणूक आयोग आपल्या संकेतस्थळावर निकाल अद्ययावत करण्यासाठी विलंब लावत असल्याची तक्रार केली, मात्र आयोगाने ती सपशेल फेटाळून लावली.

हरयाणाचे निकाल काँग्रेसला अमान्य - जयराम रमेश

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेस पक्षाने अमान्य केला असून त्यामागे कारस्थान असल्याचा आरोप केला आणि लोकशाही प्रक्रियेच्या उपकरणांच्या सत्यतेबाबतच गंभीर प्रश्न उपस्थित केले. हरयाणा निवडणुकीचे निकाल हा पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रियेचा पराभव आहे, असा आरोप पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी केला आहे. मतमोजणी प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत १४ मतदारसंघांत त्रुटी होत्या, आम्ही हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर नेणार आहोत. हरयाणातील निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक आहेत. वास्तवता आणि जनतेच्या इच्छेविरुद्धचे हे निकाल आहेत. अशा स्थितीत हे निकाल काँग्रेसला स्वीकारता येणार नाहीत, असेही रमेश यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हरयाणात आमच्याकडून विजय हिसकावून घेण्यात आला आहे, काँग्रेसला हरण्यास भाग पाडण्यात आले आहे, मात्र आता हा अध्याय संपलेला नाही, असेही ते म्हणाले.

हरयाणाचे निकाल निराशाजनक - सेलजा

हरयाणा निवडणुकीचे निकाल निराशाजनक आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यामागील कारणांचा आढावा घेतील. कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे वेदना होत आहेत. पराभवाच्या कारणांची पक्षश्रेष्ठी मीमांसा करतील. हरयाणा काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पक्षश्रेष्ठी योजना आखतील. अशा प्रकारचे निकाल येण्यास कोण कारणीभूत आहेत त्यांचा शोध घेतला जाईल, असे काँग्रेसच्या नेत्या कुमारी सेलजा यांनी म्हटले आहे.

'एनसी'ला नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न सुरू होते - ओमर अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सला (एनसी) नेस्तनाबूत करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेत ते पक्षच नामशेष झाले, असे पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी येथे सांगितले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे गंडेरबल आणि बडगाम या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १० हजारांहून अधिक आणि १८ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी पीडीपीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

गेल्या पाच वर्षांत अनेक पक्ष, संघटना स्थापन करण्यात आल्या. ‘एनसी’ला नेस्तनाबूत करणे हाच केवळ त्यांचा उद्देश होता; परंतु परमेश्वराची आमच्यावर कृपादृष्टी होती, ज्यांनी आम्हाला नामशेष करण्याचा प्रयत्न केला, तेच पराभूत झाले. बडगाम मतदारसंघातून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ओमर अब्दुल्ला वार्ताहरांशी बोलत होते. अब्दुल्ला यांनी यावेळी बडगामच्या मतदारांचे आभार मानले. निवडणुकीच्या निकालामुळे पक्षाची जबाबदारी वाढली आहे, आता जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावयाची आहे आणि पुढील पाच वर्षांसाठी आमचे हेच उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री

नॅशनल कॉन्फरन्सला घवघवीत यश मिळताच पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तर हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंह सैनी हेच विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले असून दसऱ्याला त्यांचा शपथविधी होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

विकासाच्या राजकारणाचा विजय, ‘एनसी’चे अभिनंदन

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. विकासाचे राजकारण आणि उत्तम प्रशासन यांचा हा विजय आहे. जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पक्ष कोणतीही कसूर ठेवणार नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अभिनंदन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील यावेळच्या निवडणुका विशेष होत्या. ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान केले त्यावरून जनतेचा लोकशाहीवर विश्वास असल्याचे सिद्ध झाले, असे मोदी म्हणाले. भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान केल्याबद्दल मोदी यांनी हरयाणातील मतदारांचे आभार मानले आहेत. हा पक्षाचा मोठा विजय असून त्यामागे कार्यकर्त्यांची कठोर मेहनत आहे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला - केजरीवाल

निवडणुकीत कोणीही अतिआत्मविश्वास बाळगू नये, हा सर्वात मोठा धडा हरयाणातील निकालाने शिकविला आहे, असे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. जनमत भाजपविरुद्ध असतानाही काँग्रेस सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानंतर केजरीवाल यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही निवडणूक सहजपणे घेऊ नये, प्रत्येक निवडणूक आणि जागा याकडे गांभीर्यानेच पाहावे लागते, असेही केजरीवाल म्हणाले.

जागावाटपाच्या मुद्द्यावरून आप आणि काँग्रेस यांची आघाडी होऊ शकली नव्हती. या निवडणुकीत ‘आप’ला एकही जागा पटकावता आली नाही, तर काँग्रेसही बहुमताचा आकडा गाठण्यापासून दूर राहिला.

मोदींवर जनतेचा अतूट विश्वास असल्याचे सिद्ध - अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर शेतकरी, गरीब, मागासवर्ग, सैनिक आणि युवकांचा अतूट विश्वास असल्याचे हरयाणाच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. तर मोदी यांच्या आश्वासनाप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडल्या असून तेथे लोकशाहीचे पुनरुज्जीवन झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. वीरभूमी असलेल्या हरयाणातील जनतेने काँग्रेसच्या नकारात्मक आणि फुटीर राजकारणाला नाकारले आहे. काँग्रेसने जनतेमध्ये जात आणि प्रदेश यावरून फूट पाडली आहे. जनतेने भाजपच्या १० वर्षांच्या विकासाच्या आणि लोककल्याणाच्या कामाची निवड केली आहे, असेही शहा म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचे साम्राज्य होते, लोकशाहीची दररोज हत्या होत होती. मात्र आता भाजपच्या राजवटीत लोकशाहीचा महोत्सव साजरा झाला. जनतेने निर्भय वातावरणात आपले लोकप्रतिनिधी निवडले, असेही शहा यांनी नमूद केले.

अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मंत्रालयात पुन्हा जाळीवर उड्या; आदिवासी कोट्यातून आरक्षणाच्या मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक

मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी चुली, शेकोट्या बंद; हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी BMC ची कडक मार्गदर्शक तत्त्वे

गुजरातचे दोन ठग महाराष्ट्र लुटताहेत; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी, शहांवर सडकून टीका

Women's T20 WC: स्मृतीकडून अपेक्षा, हरमनप्रीतबाबत अद्याप संभ्रम; भारताची आज लंकेशी लढत, फलंदाजांच्या कामगिरीची चिंता