राजौरी : देशाची सेनादले जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवतील, असा मला संपूर्ण आत्मविश्वास आहे. पण, तसे करताना काळजी घेतली पाहिजे. दहशतवाद संपवण्याबरोबरच देशाच्या नागरिकांची मने जिंकणेही सेनादलांचे काम आहे, असा सल्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सेनादलांना दिला.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सेनादलांच्या ताब्यातील तीन संशयितांचा नुकताच मृत्यू झाला. तसेच पूंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी कारवाईत चार सैनिक शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी बुधवारी राजौरीचा दौरा करून लष्करी तयारीचा आढावा घेतला. तसेच सैनिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी दहशतवादविरोधी कारवाया करताना सावधगिरी बाळगण्याचा आणि चुका टाळण्याचा सल्ला दिला.
सैनिकांच्या मनोधैर्यावर आणि शौर्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवलाच पाहिजे आणि तुम्ही आत्मविश्वासाने आगेकूच केली पाहिजे. तुम्ही विजय मिळवाल, अशी मला पूर्ण खात्री आहे. पण, देशाचे संरक्षण करत असतानाच नागरिकांची मने जिंकण्याची जबाबदारीही तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीनेच काम करत असाल. पण, काही वेळा हताशा येऊ शकते. पण, त्याचा परिणाम नागरिकांवर होता कामा नये. तुम्हाला नागरिकांच्या जवळ राहून काम करायचे आहे. त्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे, असे राजनाथ सिंह यांनी सैनिकांना सांगितले.
राजौरी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत लष्कराने सफीर हुसैन, मोहम्मद शौकत आणि शबीर अहमद या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. २२ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. लष्कराने त्यांचा कथितरीत्या छळ केल्याने मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून व्हायरल झाला. त्यानंतर वातावरण तापले. त्याशिवाय लष्कराने चौकशीदरम्यान कथितरीत्या मारहाण केलेल्या मोहम्मद झुल्फकार, मोहम्मद बेताब, फझल हुसेन आणि मोहम्मद फारुख या चौघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. दरम्यान, सूरणकोट आणि थानामंडी भागात अद्याप लष्कराची शोधमोहीम सुरू आहे.
मृतांच्या नातेवाईकांची भेट
राजनाथ सिंग यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यासोबत तिन्ही मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना न्याय मिळेल, असे आश्वासनही दिले. सरकारतर्फे मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. तसेच त्यांनी लष्कराकडून चौकशीदरम्यान जखमी झालेल्या चार नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि वाचारपूस केली.