नवी दिल्ली : जगभरात भारत हा खास मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यामुळे भारतीय जेवणाची चव वाढते. भारतीय मसाले आणि जेवण खाण्यासाठी जगभरातील पर्यटक हे भारतात येतात. परंतु, हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारने भारतातील मसाले बवणाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दोन कंपन्यांच्या काही मसाल्यावर बंदी घातली आहे. हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारने एमडीएच प्रायवेट लिमिटेड आणि एवरेस्ट फूड प्रोडक्ट्स प्रायवेट लिमिटेड या मसाले उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे. यामुळे हाँगकाँग आणि सिंगापूर या देशाने भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे.
हाँगकाँग सरकारच्या अन्न सुरक्षा केंद्राने (CFS) 5 एप्रिल रोजी घोषित केले की, MDH कंपनीच्या तीन मसाल्यांमध्ये मद्रास करी पावडर, सांभर मसाला पावडर आणि करी पावडर यात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.
याशिवाय एव्हरेस्ट कंपनीच्या फिश करी मसाल्यावर सिंगापूर सरकारच्या खाद्य सुरक्षा प्राधिकरणाने कारवाई केली आहे. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे सिंगागपूरमध्ये फिश करी मसाल्यावर बंदी घातली आहे.
भारतीय मसाल्यांवर कारवाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर 2023 मध्ये, यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) साल्मोनेला आढळून आल्यानंतर एव्हरेस्ट उत्पादने काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
केंद्र सरकारने मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे दिले आदेश
भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एफएसएसएआय (FSSAI) ने एमडीएस आणि एव्हरेस्ट या कंपनीच्या मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहे.