राष्ट्रीय

पाकमधून आलेल्या हिंदूंवर हेरगिरीसाठी बळजबरी, भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून भंडाफोड

महाराष्ट्रात राहणारे काही पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी बळजबरीने हेरगिरी करत असल्याची धक्कादायक बाब भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राहणारे काही पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी बळजबरीने हेरगिरी करत असल्याची धक्कादायक बाब भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणली आहे. काही पाकिस्तानी हिंदू महाराष्ट्रात राहतात, पण ते धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अधूनमधून पाकिस्तानला भेट देतात. तेथे पाकिस्तानी दहशतवादी संघटना व गुप्तहेर संघटना आयएसआय या हिंदूना हेरगिरी करण्याच्या कामी नेमतात, अशी माहिती समोर आली आहे. अशी हिंदू कुटुंबे भारतात राहून संशयास्पद कारवाया करतात, तसेच भारताची संवेदनशील माहिती पाकच्या आयएसआय संघटना आणि दहशतवाद्यांना पुरवतात, असे उघड झाले आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाअंती आयएसआयच्या कामाची एक पद्धत उघड झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात राहणारे अनेक पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात व्हिजिटर व्हिसा मिळण्यासाठी अर्ज करीत असतात. पाकिस्तानमधील नातेवार्इक यांना भेटण्यासाठी, तेथे कार्यक्रमास उपस्थित राहाण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना पाक भेटीवर जायचे असते. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर आयएसआयचे व दहशतवाद्यांचे हस्तक त्वरित या हिंदूना गाठतात. त्यांना महाराष्ट्रात गेल्यानंतर कशा प्रकारे माहिती जमा करायची, कोणती माहिती जमा करायची, याबाबत काटेकोर प्रशिक्षण देतात व त्यांच्या मनावर हे काम बिंबवतात. जे या कामाला नकार देतात, त्या हिंदूंच्या पाकिस्तानातील कुटुंबियांना छळण्याची धमकी या पाकिस्तानी संघटना देतात. अशा प्रकारे ब्लॅकमेल व मनवळणी या माध्यमातून या हिंदूंना पाकिस्तानी हेरगिरी करण्यासाठी भाग पाडण्यात येते. तयार झालेल्या हिंदूंना भारतीय सीम कार्ड, व्हॉटसअॅप वगैरे सुविधा दिल्या जातात. भारतीय लष्कराची ठिकाणे, लष्कराच्या हालचाली, महत्वाची स्थळे, गुगल लोकेशन, प्रत्यक्ष लोकेशन आणि संवेदनशील ठिकाणे या बाबतची माहिती या हिंदू कुटुंबाकडून मिळवली जाते.

अलिकडेच ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये गुजरात एटीएसने तारापूर येथून लाभशंकर महेश्वारी याला अटक केले होते. त्याच्या चौकशीदरम्यान अशाच प्रकारची हेरगिरीची पद्धत उघडकीस आली होती. भारती लष्कराच्या हेरांनी लाभशंकर महेश्वरीची टीप एटीएसला दिली होती. तेव्हा त्याने आपण मूळचा पाकिस्तानी असून २००५ साली भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे मान्य केले होते.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार