राष्ट्रीय

काँग्रेसने सुचवलेली चार नावे झुगारली; शशी थरूर यांच्यावर केंद्राचा विश्वास, सर्वपक्षीय शिष्टमंडळात थरूर यांना पहिले स्थान

अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने देशाच्या भूमिकेचे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यासाठी एक सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे काँग्रेसच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेहा जाधव - तांबे

नवी दिल्ली : अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने देशाच्या भूमिकेचे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यासाठी एक सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे काँग्रेसच्या भुवया उंचावल्या आहेत. शशी थरूर यांनी या आमंत्रणाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. "राष्ट्रीय हितासाठी मी कधीही मागे हटणार नाही," असे स्पष्ट करत थरूर यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे.

संसदीय कामकाज मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार, या शिष्टमंडळाचे नेतृत्व शशी थरूर करतील. त्यांच्यासोबत भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जद(यू)चे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (शरद पवार गट) आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे (शिंदे गट) यांचा समावेश आहे.

काँग्रेसने सुचवलेली चार नावे झुगारली; थरूर यांच्यावर केंद्राचा विश्वास

सदर शिष्टमंडळासाठी काँग्रेसने सरकारकडे आपल्याकडून चार नावे सुचवली होती – आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, १६ मे रोजी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला आणि शिष्टमंडळासाठी प्रतिनिधींची नावे मागितली. मात्र, केंद्र सरकारने या यादीतील कुठल्याही नेत्याला न निवडता थरूर यांना संधी दिली.

थरूर यांचे वक्तव्य आणि पक्षातील मतभेद

या निमंत्रणावर प्रतिक्रिया देताना शशी थरूर म्हणाले, “भारत सरकारने मला देशाचे मत मांडण्यासाठी पाच महत्त्वाच्या देशांना भेट देणाऱ्या शिष्टमंडळात सहभागी केले याचा मला सन्मान वाटतो. जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न असतो, तेव्हा मी नेहमीच तयार असतो.”

अलिकडेच थरूर यांनी केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईचे समर्थन करत संयमी आणि योग्य पद्धतीची कारवाई झाल्याचे म्हटले होते. या भूमिकेचे भाजपने स्वागत केले, परंतु, काँग्रेसमध्ये काही नेते नाराज असल्याचे समजते. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, “ही थरूर यांची वैयक्तिक भूमिका आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही.”

थरूर यांचे काँग्रेसमधील स्थान

शशी थरूर यांचे काँग्रेसमधील स्थान कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक वक्तव्य केल्यामुळे त्यांना प्रवक्त्याच्या भूमिकेतून दूर करण्यात आले होते. २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यांच्या भूमिकेमुळे पक्षात मतभेद वारंवार समोर आले आहेत.

शिष्टमंडळाची भूमिका

हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ २३ मे पासून १० दिवसांच्या राजनैतिक दौऱ्यावर जाईल. वॉशिंग्टन, लंडन, अबू धाबी, प्रिटोरिया आणि टोकियो या पाच प्रमुख राजधानींना भेट देऊन, भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाविषयी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत अलीकडील घडामोडींविषयी ते परदेशी सरकारांना माहिती देतील.

शशी थरूर यांचा या शिष्टमंडळात समावेश आणि त्यांनी घेतलेली भूमिका केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्यापुरती मर्यादित नाही, तर ती काँग्रेसमधील अंतर्गत समिकरणे आणि मतभेदही अधोरेखित करते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर थरूर आणि काँग्रेस यांच्यातील संबंध पुढे कशी दिशा घेतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल