मुंबई : सणासुदीच्या काळाआधी मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर अलीकडच्या आठवड्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत काहीशी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात अचानक झालेल्या मोठ्या चढ-उतारामुळे ग्राहकांनी ऐच्छिक खरेदी पुढे ढकलली असून ते दर स्थिर होण्याची वाट पाहत आहेत, असे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ (डब्ल्यूसीजी) ने गुरुवारी सांगितले.
तथापि, सण आणि लग्नसराईचा हंगाम जसा पुढे जाईल तशी मागणी सुधारेल अशी अपेक्षा आहे. स्थिर गुंतवणूक मागणी आणि लग्नसराईसाठी लागणाऱ्या खरेदीचा याला पाठिंबा मिळेल; जरी वाढलेले दर आणि चढ-उतार यामुळे ऐच्छिक खरेदीवर मर्यादा येत राहू शकतात, असे डब्ल्यूसीजीच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
डब्ल्यूसीजीच्या भारत संशोधन प्रमुख कविता चाको यांनी सांगितले की, उद्योगाकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार, ऑगस्टच्या अखेरीस सुरू झालेल्या सणासुदीच्या काळाआधी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत जी तेजी दिसली होती, ती अलीकडच्या आठवड्यांत मंदावली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात झालेली मोठी वाढ आणि त्यानंतर आलेल्या घसरणीमुळे अनेक ग्राहक ‘वाट पाहा आणि पहा’ च्या भूमिकेत आहेत, ज्यामुळे त्यांनी खरेदी लांबणीवर टाकली आहे, असे त्या म्हणाल्या.
किरकोळ विक्रेतेही साठा जमा करण्याबाबत सतर्क आहेत. प्रत्यक्ष होणाऱ्या मागणीनुसारच माल भरण्याला ते प्राधान्य देत आहेत, तर काही उत्पादकांनी किरकोळ विक्रेत्यांकडून ऑर्डर्स मिळण्यास उशीर होत असल्याचे सांगितले आहे.
तथापि, लग्नसराईशी संबंधित मागणी तुलनेने स्थिर राहिली आहे; जरी काही अहवालांनुसार ग्राहक आता वजनाने हलक्या असलेल्या दागिन्यांकडे वळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मोठ्या किरकोळ विक्रेत्यांना तुलनेने अधिक मागणी दिसून आली आहे आणि त्यांनी नवीन उत्पादनांचे लाँचिंग, विपणन (मार्केटिंग) उपक्रम आणि प्रमोशनल मोहिमा वाढवल्या आहेत, तसेच जलद विक्री होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी आपल्या रणनीतीत बदल केला आहे.
या मंदावलेल्या मागणीनंतरही, मुख्य सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामात मागणी वाढेल याबाबत व्यापारी वर्ग सावधपणे आशावादी आहे.
भौतिक सोन्यातील गुंतवणुकीची मागणी स्थिर असल्याचे बाजार घटकांनी सांगितले आहे, तसेच काही गुंतवणूकदार भौतिक सोन्याकडून डिजिटल सोन्याच्या पर्यायांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. देशांतर्गत सोन्याचे दर आयात समानतेपेक्षा खाली राहिले आहेत, ज्यावरून मागणीच्या तुलनेत स्थानिक पुरवठा पुरेसा असल्याचे दिसून येते.
सोने आयातीत घसरण
ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या आयतीत मोठी घसरण झाली असून ती २.३ अब्ज डॉलरवर आली आहे, जी महिन्याच्या आधारावर ४५ टक्के आणि वार्षिक आधारावर ५८ टक्क्यांनी कमी आहे, असा खुलासा डब्ल्यूसीजीने केला आहे.