अनेक वर्षांपासून जुन्या Gmail IDमध्ये अडकून पडलेल्या युजर्संना गुगलकडून मोठा दिलासा मिळणार आहे. गुगल लवकरच अशी सुविधा सुरू करणार आहे, ज्यामुळे युजर्संना @gmail.com ईमेल आयडी बदलता येणार आहे. विशेष म्हणजे, त्यांचा संपूर्ण गुगल अकाउंट (Google Account) तसाच कायम राहणार आहे.
ही सुविधा सर्वप्रथम गुगलच्या हिंदी सपोर्ट पेजवर दिसून आली आहे. 9to5Google या टेक वेबसाइटने याची माहिती दिली आहे. ईमेल आयडी बदलल्यानंतरही युजर्सचे जुने मेल्स, डेटा, गुगल ड्राइव्ह, फोटोज, सबस्क्रिप्शन आणि खरेदी केलेल्या सेवा सुरक्षित राहणार आहेत.
जुना Gmail आयडी Alias म्हणून राहणार
महत्त्वाचे म्हणजे, जुना Gmail आयडी डिलीट होणार नाही, तर तो अॅलियस (alias) म्हणून सुरू राहील. त्यामुळे जुन्या ईमेल आयडीवर आलेले सर्व मेल्स नवीन इनबॉक्समध्येही मिळतील. तसेच, युजर्स जुन्या किंवा नव्या, दोन्ही ईमेल आयडीने लॉगिन करू शकणार आहेत.
Gmail आयडी बदलण्यावर मर्यादा
9to5Google च्या सपोर्ट डॉक्युमेंटनुसार, गुगलने या सुविधेसाठी काही नियम घातले आहेत.
Gmail आयडी दर १२ महिन्यांत फक्त एकदाच बदलता येईल.
एकूण ३ वेळा बदलण्याची मर्यादा (म्हणजे एका अकाउंटला जास्तीत-जास्त ४ ईमेल ID)
नवीन ईमेल बदलल्यानंतर १२ महिने तो ईमेल डिलीट करता येणार नाही.
जुना ईमेल ID १२ महिन्यांपर्यंत नवीन Gmail अकाउंटसाठी वापरता येणार नाही.
काही जुन्या कॅलेंडर इव्हेंट्समध्ये जुना ईमेल ID दिसू शकतो
ही सुविधा मर्यादित युजर्ससाठी
गुगलने ही सुविधा अधिकृतपणे इंग्रजी भाषेतील डॉक्युमेंटमध्ये जाहीर केलेली नाही. मात्र, कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, ही सुविधा हळूहळू (Gradual Rollout) सर्व युजर्ससाठी उपलब्ध केली जाईल. तज्ज्ञांच्या मते, २०२६ च्या सुरुवातीपर्यंत ही सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोणासाठी उपयुक्त ठरणार?
हे अपडेट विशेषतः त्या युजर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी अनप्रोफेशनल नावाने Gmail आयडी तयार केला आहे. ज्यांना अधिक स्वच्छ आणि व्यावसायिक ईमेल आयडी हवा आहे. ज्यांना नवीन अकाउंट बनवून डेटा ट्रान्सफर करण्याचा त्रास टाळायचा आहे.
दरम्यान, हे फीचर सर्वांसाठी कधी उपलब्ध होणार, याबाबत Google कडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.