नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील नगला श्री पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. शनिवारी (दि. १७) सकाळी हे पाचही जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. कुटुंबाने आदल्या रात्री नूडल्स खाल्ले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख महेश (३७), त्यांची पत्नी ललिता (३५) आणि त्यांची तीन मुले लड्डू (११), मिष्टी (७) व साक्षात (३) अशी पटली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री नूडल्स खाल्ले, सकाळी मृतावस्थेत आढळले
प्राथमिक चौकशीदरम्यान शेजारी आणि महेश यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्री नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ते घरात मृतावस्थेत आढळले. मृतांच्या तोंडातून फेस आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या परिस्थितीचा मृत्यूशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांसह न्यायवैद्यक पथक घटनास्थळी
शनिवारी सकाळी रबुपुरा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेसह अन्नसुरक्षा विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. न्यायवैद्यक आणि क्षेत्रीय तपास पथकाने घराची पाहणी करून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
पोलिसांनी प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, केवळ नूडल्स खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या माहितीवरून विषबाधा झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. शवविच्छेदन अहवाल आणि इतर वैज्ञानिक तपासण्यांनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वैद्यकीय आणि न्यायवैद्यक तपासणीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.