गुरुग्राम : महिला बाईक रायडरला कारने धडक देऊन घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी कल्याण बैन्सला याला मंगळवारी (दि. १५) राजस्थानमधील दौसा येथून पोलिसांनी अटक केली आहे. गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. सिया नावाची महिला बाइक रायडर आपल्या ग्रुपसोबत जात असताना कारने तिच्या बाइकला धडक दिली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले आहे.
या प्रकरणात आधीच बेदरकारपणे वाहन चालवणे आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहता भारतीय न्याय संहितेतील 'खुनाचा प्रयत्न' अर्थात कलम १०९ वाढवण्यात आले.
नेमकी घटना काय?
माहितीनुसार, रविवारी (दि. १३) सकाळी गोल्फ कोर्स रोडवर ही घटना घडली. सिया नावाची महिला बाईक रायडर आपल्या ग्रुपमधील इतर रायडर्ससोबत 'ॲप्रिलिया आरएस ४५७' या स्पोर्ट्स बाईकवरून प्रवास करत होती. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची 'सेडान' (मारुती सुझुकी सियाझ) कार तिच्या जवळ आली. कारमधील व्यक्तींकडून आपल्याला वारंवार थांबण्याचे इशारे करण्यात आले आणि आक्रमक पद्धतीने वाहन चालवले गेले असा आरोप सियाने केला.
सियाच्या म्हणण्यानुसार, तिने कारचालकाला अंतर राखून वाहन चालवण्यास सांगितले. मात्र, कारने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. तिच्यासोबत असलेल्या एका रायडरने कारला तिच्या जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतरही परिस्थिती आटोक्यात आली नाही.
बाइकला धडक अन् सिया रस्त्यावर फेकली गेली...
सियाने केलेल्या आरोपानुसार, कारचालकाने तिच्या बाईकसमोर कार आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कारने तिच्या स्पोर्ट्स बाईकला धडक दिली. धडकेनंतर सिया बाईकवरून फेकली गेली, तर तिची बाईक रस्त्यावरून अनेक मीटर घसरत गेली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सिया आणि तिच्यासोबत असलेल्या अन्य रायडर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
अपघातानंतर सियाच्या एका मित्राने कारचा पाठलाग करून वाहतूक सिग्नलवर ती अडवल्याचे सांगण्यात आले. मात्र, चालकाने आपली चूक नाकारली आणि त्यानंतर तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सियाने घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. व्हिडीओमध्ये कार सियाच्या बाईकच्या दिशेने येताना आणि धडक झाल्यानंतर ती रस्त्यावर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गुरुग्राम पोलीस आणि हरियाणा पोलिसांना टॅग करत आरोपीवर कारवाईची मागणी केली.
सियाने आपण महिला असल्यामुळे लक्ष्य करण्यात आल्याचाही आरोप केला. या घटनेत आपला जीव जाऊ शकला असता आणि अपघातानंतर चालकाने आपली विचारपूसही केली नाही, असा दावा तिने केला.
आरोपीचा अजब दावा
दरम्यान, आरोपी कल्याण बैन्सलाने ही धडक जाणीवपूर्वक दिली नसल्याचे म्हटले आहे. यू-टर्नजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने धडक झाल्याचा दावा त्याने केला. बाईकर ग्रुपकडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना मारहाण होण्याची भीती वाटल्याने आपण घटनास्थळावरून निघून गेलो, असेही त्याने सांगितले.
'खुनाचा प्रयत्न' कलम वाढवले
प्रकरणाची स्वतःहून दखल घेत गुरुग्राम पोलिसांनी सेक्टर-५६ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि कलम १२५ (दुखापत करणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर प्रकरणाच्या तपासात कलम १०९ अर्थात 'खुनाचा प्रयत्न' वाढवण्यात आले.
गुरुग्राम पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. अखेर त्याला राजस्थानमधील राजगढ येथून अटक करण्यात आली. आता या घटनेमागील नेमका घटनाक्रम, आरोपीचा हेतू आणि व्हिडीओतील पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.
तपासात पुढे काय?
या प्रकरणातील व्हिडीओ फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि सियाची तक्रार यांचा आधार घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत. हिट-अँड-रनच्या या प्रकरणात 'खुनाचा प्रयत्न' कलम वाढवण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.