हल्द्वानी : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील ८ फेब्रुवारीला झालेल्या हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड अब्दुल मलिक याला दिल्लीतून अटक करण्यात आली असल्याचे उत्तराखंड पोलिसांनी सांगितले.
नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद नारायण मीणा यांनी सांगितले की, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसह विविध राज्यांमध्ये मलिक आणि त्याचा मुलगा अब्दुल मोईदचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाने पन्नाशीत असलेल्या मलिकला दिल्लीतून अटक केली आहे. मात्र त्याचा मुलगा अजूनही फरार आहे.
आम्ही मलिकला हल्द्वानी येथे आणले आहे. तो आमच्या ताब्यात आहे. त्याला लवकरात लवकर न्यायालयात हजर केले जाईल. मलिक व्यतिरिक्त, शनिवारी आणखी दोन दंगलखोरांना अटक करण्यात आली ज्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. मलिकने हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात ‘बेकायदेशीर’ मदरसा बांधल्याचा आरोप आहे. त्या मदरशाच्या विध्वंसामुळे ८ फेब्रुवारी रोजी नानिताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथील बनभूलपुरा भागात हिंसाचार झाला.
मलिक याने प्रशासनाच्या कारवाईला कडाडून विरोध केला होता आणि त्याची पत्नी साफिया यांनी महापालिकेच्या नोटिशीला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. तथापि न्यायालयाने त्यांना तात्काळ दिलासा दिला नाही. तेथील ती वास्तू पाडण्यात आली, त्यानंतर मुस्लीमबहुल बनभूलपुरा भागात दगडफेक आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडविल्या गेल्या.
१६ फेब्रुवारी रोजी मलिक आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती व त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. बनभूलपुरा हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला असून पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत.