चेन्नई: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट पार करणं अनेकांना कठीण जातं. मात्र तमिळनाडूतील एका जिद्दी तरूणानं दोन्ही हात नसतानाही ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा परवाना मिळवला आहे. के. थानसेन असं या युवकाचं नाव असून त्यानं पायाच्या साहाय्यानं कार चालवून ही असाध्य गोष्ट साध्य केली आहे.
चेन्नईतील ३१ वर्षीय के.थानसेनला बालपणीच एका विद्युत अपघातात कोपराच्या खाली दोन्ही हात गमावावे लागले होते. त्याला उत्तर चेन्नई प्रादेशिक परिवहन कार्यालयानं विशेष ड्रायव्हिंग लायसन्स दिलं आहे. सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या फिटनेस सर्टिफिकेटच्या आधारे व्यासपाडी येथील के. थानसेन याला परवाना देण्यात आला आहे.
ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्या दिव्यांगांना प्रोत्साहन द्यावं...
थानसेन डॉ. आंबेडकर शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्या त्याच्यासारख्या दिव्यांगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना जास्त त्रास न होता परवाना दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यानं ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त झाल्यानंतर दिली.
“गेल्या आठवड्यात परवाना मिळाल्यानंतर लगेच, मी माझ्या कुटुंबाला कारमधून पेरांबूर येथील मंदिरात नेलं. अर्थात, रस्त्यावरील लोकांना आश्चर्य वाटलं. पायांनी कोणतीही अडचण न येता कार चालवल्याबद्दल अनेकांनी माझं कौतुक केले,” असं तो म्हणाला.
आपला आतापर्यंतचा सर्वात लांबचा प्रवास तिरुट्टानी येथील मंदिरापर्यंत होता, असं थानेसेननं सांगितलं. आपल्या सोयीनुसार वाहनांमध्ये बदल केला. हँड ब्रेकजवळ हॉर्न, इंडिकेटर, वायपर आणि लाईटचे स्विचेस ठेवले असल्याचं त्यानं सांगितलं.
पुढचं ध्येय बाईक चालवणं....
“कार चालवणे हे त्याचं स्वप्न होते. शेवटी तो ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दाखल झाला आणि पायांनी गाडी चालवायला शिकला.मी पूर्णपणे ऑटोमॅटिक कार चालवत असल्यानं मला कोणतीही अडचण येत नाही. मी एका पायानं स्टीयरिंग हाताळतो आणि दुसऱ्या पायाने एक्सलेटर आणि ब्रेक सांभाळतो. ” असं थानेसेन म्हणाला.
“माझं पुढचं लक्ष्य बाईक आहे. मी सध्या बाईक चालवण्याचा सराव करत आहे. त्याचाही परवाना मिळवायचा आहे,” असं तो म्हणाला.