काही दिवसांपूर्वी डॉक्टर आणि रुग्णाच्या हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये डॉक्टर आणि रुग्णाने एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले होते. त्यानंतर या प्रकरणात डॉक्टरवर कारवाई झाली होती. मात्र आता हा वाद मिटला असून डॉक्टर आणि रुग्णाने मिठी मारत एकमेकांची माफी मागितली आहे.
नेमके प्रकरण काय?
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (IGMC) मध्ये २२ डिसेंबरला डॉक्टर आणि रुग्णामधील मारहाणीच्या घटनेने देशभरात लक्ष वेधले. मागच्या आठवड्यात या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या रुग्णाची एंडोस्कोपी झाली होती आणि डॉक्टरांनी त्याला 'आराम कर' असं सांगितलं होतं. पण एकेरी उल्लेख केल्याने रुग्ण भडकतो आणि 'तुम्ही घरीही असंच बोलता का?' असा प्रश्न डॉक्टरला विचारतो. यावर डॉक्टर चिडतो आणि दोघांमध्ये भांडण होतं. हे भांडण इतकं वाढतं की त्या दोघांमध्ये बेदम हाणामारी होते. आधी डॉक्टर रुग्णाला मारतो लाथ नंतर रुग्ण डॉक्टरला लाथ मारतो. डॉक्टर आणि रुग्णाला आवरण्याचा प्रयत्न तिथे असलेले लोक करतात, पण डॉक्टर काही थांबायचं नाव घेत नाही. खूप प्रयत्न करून त्या दोघांचं भांडण थांबतं.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.३०) डॉक्टर आणि रुग्णाने हा वाद संपवला आहे.
आता सर्व गैरसमज दूर
या प्रकरणातील डॉक्टर राघव नरुला माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ जे घडलं त्यात दोघांची चूक होती. आता आम्ही एकमेकांची समजूत काढली. आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत. आम्ही एकमेकांना मिठी मारून माफी मागितली आणि हे प्रकरण इथेच संपवले.”
लवकरच तुम्ही मला...
“डॉक्टरांनी आपली चूक मान्य करून माफी मागितली. त्यानंतर मीही हा विषय इथेच संपवण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही. लवकरच तुम्ही मला डॉक्टर साहेबांच्या लग्नातही पाहाल,” असे म्हणत रुग्ण अर्जुन पंवार यांनीही वाद मिटल्याचे सांगितले.
डॉक्टरवर शिस्तभंगाची कारवाई
दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारने २४ डिसेंबरला या प्रकरणात वरिष्ठ निवासी डॉक्टरवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर आणि रुग्ण दोघांचीही चूक असल्याचे नमूद करण्यात आले होते. या घटनेनंतर IGMC मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दोन्ही बाजूंनी समेटाचा निर्णय घेतल्यानंतर आता रुग्णालयातील परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आहे.